The possibility of increasing 'lockdown' was rejected; Explanation of the Central Government | ‘लॉकडाऊन’ वाढविण्याची शक्यता फेटाळली; केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

‘लॉकडाऊन’ वाढविण्याची शक्यता फेटाळली; केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सध्या सुरू असलेले देशव्यापी ‘लॉकडाऊन’ येत्या १४ एप्रिलच्या मध्यरात्री संपल्यानंतर हे सर्वंकष निर्बंध आणखी एक आठवड्याने वाढविण्याची शक्यता केंद्र सरकारने सोमवारी स्पष्टपणे फेटाळून लावली.

‘लॉकडाऊन’ला एक आठवडाही पूर्ण होण्याआधीच अशी शक्यता वर्तविणाऱ्या गावगप्पांवर आधारित अफवा व वदंता सुरू झाल्याने सरकारने त्यांचे ठामपणे खंडन करून हे सर्व निराधार असल्याचे म्हटले आहे. पत्र सूचना कार्यालयाने (पीआयबी) एका टष्ट्वीटमध्ये म्हटले की, आम्ही अशा प्रकारच्या बातम्या व वदंता कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या निदर्शनास आणल्या; तेव्हा त्यांनी आश्चर्य व्यक्त करून त्या पूर्णपणे निराधार असल्याचे सांगितले. ‘लॉकडाऊन’ची मुदत वाढविण्याचा कोणताही विचार नाही.

‘लॉकडाऊन’चे बºयापैकी पालन होत असतानाच विविध राज्यांमधून हजारो स्थलांतरित कामगारांचे तांडे घराकडे परतत असल्याच्या बातम्यांनी देशभर गहजब झाला होता. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’मधून, या कठोर पावलामुळे जनतेला सोसाव्या लागलेल्या हालअपेष्टांबद्दल क्षमायाचना केली होती. काही दिवसांसाठी सर्वांना कळ सोसावीच लागेल, ‘लॉकडाऊन’ पाळला नाही, तर या धोक्यापासून देशाला वाचविणे कठीण होऊन बसेल.

संयम सोडू नये

‘लॉकडाऊन’ आता लोकांच्या अंगवळणी पडत चालला आहे. लोकांनी चुकीच्या व दिशाभूल करणाºया वावड्यांना बळी पडून संयम सोडू नये.

आणीबाणीच्या अफवांचे लष्कराने केले खंडन

च्सध्याचा ‘लॉकडाऊन’ संपल्यानंतर एप्रिलच्या मध्यापासून देशात आणीाबाणी लागू केली जाईल व नागरी प्रशासनाच्या मदतीला लष्करासह माजी सैनिक, एनसीसी व एएसएसलाही पाचारण केले जाईल, अशा आशयाच्या संदेशांची समाजमाध्यमांत सोमवारी सकाळपासून देवाणघेवाण सुरु झाली. त्याची लगेच दखल घेत लष्कराच्या अतिरिक्त माहिती महासंचालकांनी याचे ठामपणे खंडन केले व हे सर्व पूर्णपणे बनावट असल्याचे नमूद केले.

दक्षिण मुंबईतील सात पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिस्थिती हाताबाहेर गेल्याने तिथे लष्कराला पाचारण करण्यात आले आहे, असे संदेश व्हॉटस्अ‍ॅपवरून फिरत होते.

तेथील स्थिती पोलिसांना हाताळणे अशक्य झाल्याने तो संपूर्ण भाग लष्कराकडे सोपविण्यात आला आहे आणि तिथे लष्कराचे नियंत्रण आहे, असे ते मेसेज होते. त्याचाही लष्कराच्या प्रवक्त्याने स्पष्ट शब्दांत खंडन केले.या अफवा आहेत, आम्हांला मुंबईत कुठेही पाचारण करण्यात आलेले नाही. त्यामुळे अशा अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असेही लष्करातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

वेळीच उपायांमुळे भारताची स्थिती आटोक्यात- केंद्रीय आरोग्य मंत्रालय

परदेशातून उद्भवलेल्या कोरोनाची चाहूल लागताच आपण वेळीच उपाययोजना सुरूकेल्याने या साथीचा प्रसार होण्याच्या दृष्टीने भारताची स्थिती अनेक प्रगत देशांच्या तुलनेत अजून तरी आटोक्यात आहे, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.

देशातील कोरोनाच्या सद्य:स्थितीची माहिती देण्यासाठी होणाºया दैनिक वार्तालापात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले की, भारतात कोरोनाबाधितांची संख्या एक हजारावर पोहोचायला १२ दिवस लागले. त्या तुलनेत अनेक प्रगत देशांमध्ये हा आकडा याच काळात तीन, पाच किंवा आठ हजारांवर पोहोचला होता.

अग्रवाल म्हणाले की, एक हजाराहून अधिक लोकांना लागण झाली असली, तरी आपण अजूनही स्थानिक पातळीवर संसर्ग होण्याच्या (दुसऱ्या) टप्प्यातच आहोत. यापुढच्या म्हणजे समूह संसर्गाच्या (तिसºया) टप्प्यात आपण गेलो, तर सरकार ते नक्कीच मान्य करून तसे जाहीरही करेल. मात्र, आपल्याला जराही गाफील राहून चालणार नाही, हे अधोरेखित करताना सचिव म्हणाले की, आतापर्यंत केलेले प्रयत्न आपल्याला पाण्यात जाऊ द्यायचे नसतील, तर सरकारने सांगितलेल्या गोष्टींचे लोकांना शतप्रतिशत पालन करावेच लागेल. यात एक टक्क्याने जरी कुचराई झाली तरी ‘येरे माझ्या मागल्या’सारखी गत होईल, असेही ते म्हणाले.

चाचण्यांसाठी १६२ प्रयोगशाळा

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) वरिष्ठ अधिकारी डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या चाचण्या करण्याची सोय आता देशातील १६२ प्रयोगशाळांमध्ये उपलब्ध आहे. यापैकी ११५ प्रयोगशाळा परिषदेच्या अखत्यारीतील आहेत. त्याखेरीज ४७ खासगी प्रयोगशाळांनाही परवानगी देण्यात आली आहे. या सर्व प्रयोगशाळांमध्ये मिळून गेल्या तीन दिवसांत १,३३४ व आतापर्यंत एकूण ३८,४३२ व्यक्तींच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The possibility of increasing 'lockdown' was rejected; Explanation of the Central Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.