सर्व विषयांवर संसदेत चर्चा करण्याची पंतप्रधानांची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 01:22 AM2019-11-18T01:22:43+5:302019-11-18T01:23:00+5:30

सर्वपक्षीय बैठक; फारुक अब्दुल्लांच्या अटकेबद्दल धारेवर धरले

PM prepares to discuss all issues in Parliament | सर्व विषयांवर संसदेत चर्चा करण्याची पंतप्रधानांची तयारी

सर्व विषयांवर संसदेत चर्चा करण्याची पंतप्रधानांची तयारी

Next

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सर्व विषयांवर चर्चा करण्याची तयारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दर्शविली आहे. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार फारुक अब्दुल्ला यांना केलेल्या अटकेचा मुद्दा विरोधी पक्षीयांनी सर्वपक्षीय बैठकीत लावून धरला. अब्दुल्ला यांना संसद अधिवेशनास उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

देशातील आर्थिक मंदी, बेकारी, शेतकऱ्यांची दुरवस्था, अशा विषयांवर संसदेच्या हिवाळी अधिवेशनात चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी केली. केंद्र सरकारने आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला २७ पक्षांचे नेते हजर होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, संसद सभागृहांचे नियम व कामकाज पद्धतीच्या चौकटीत राहून सरकार सर्व विषयांवर चर्चा करायला तयार आहे. या सर्वपक्षीय बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत, काँग्रेस नेते आनंद शर्मा, तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन, लोकजनशक्तीचे नेते चिराग पासवान आदी उपस्थित होते.

खासदाराला अवैधरीत्या अटक कशी होऊ शकते?
फारुक अब्दुल्ला यांना केलेल्या अटकेचा मुद्दा नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार हसनैन मसुदी यांनी या बैठकीत उपस्थित केला. एखाद्या खासदाराला अवैधरीत्या अटक कशी होऊ शकते, असा सवाल राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी यावेळी सरकारला विचारला. फारुक अब्दुल्ला यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात आली आहे.

Web Title: PM prepares to discuss all issues in Parliament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.