PM Narendra Modi welcomes supreme courts Ayodhya verdict | Ayodhya Verdict: निर्णयाकडे जय-पराजयाच्या भावनेतून पाहू नका- मोदी
Ayodhya Verdict: निर्णयाकडे जय-पराजयाच्या भावनेतून पाहू नका- मोदी

मुंबई: संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जमीन प्रभू श्रीरामाच्या मंदिरासाठी देण्यात यावी आणि सुन्नी वक्फ बोर्डाला मशिदीसाठी पाच एकर मोक्याची पर्यायी जागा द्यावी, असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने म्हटलं आहे. अयोध्या प्रकरणात आलेल्या 'सर्वोच्च' निकालाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वागत केलं आहे. या निर्णयाकडे कोणीही जय-पराजयाच्या भावनेतून पाहू नये, असं आवाहन मोदींनी केलं आहे. रामभक्ती असो वा रहिमभक्ती, ही वेळ भारतभक्तीला सशक्त करण्याची आहे. देशातील जनतेनं शांतता, सलोखा आणि एकता टिकवून ठेवावी, असं आवाहन मोदींनी ट्विटच्या माध्यमातून केलं आहे. 'सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अनेकार्थांनी महत्त्वपूर्ण आहे. कोणत्याही वादातून तोडगा काढण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेचं पालन करणं किती महत्त्वाचं आहे, हे अयोध्या प्रकरणाकडे पाहिल्यावर समजतं. या खटल्यात प्रत्येक पक्षकाराला त्याची भूमिका स्पष्ट करण्यासाठी पुरेसा अवधी देण्यात आला. न्यायमंदिरानं कित्येक दशकं जुन्या असलेल्या प्रकरणातून सौहार्दपूर्ण मार्ग काढला,' असंदेखील मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.  
 अयोध्या प्रकरणात न्यायालयानं दिलेल्या निर्णयामुळे सर्वसामान्यांचा न्याय प्रक्रियेवरील विश्वास आणखी वाढेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. न्यायालयाच्या निर्णयानंतर आता 130 कोटी भारतीयांना हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या बंधुत्वाच्या भावनेतून शांतता आणि संयमाचा परिचय द्यायचा आहे, असंदेखील मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Web Title: PM Narendra Modi welcomes supreme courts Ayodhya verdict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.