pm narendra modi niece damayanti ben bag snatched in delhi civil lines | पंतप्रधान मोदींच्या पुतणीची पर्स हिसकावून चोरटे पसार; राजधानी दिल्लीतील प्रकार
पंतप्रधान मोदींच्या पुतणीची पर्स हिसकावून चोरटे पसार; राजधानी दिल्लीतील प्रकार

ठळक मुद्देराजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुतणीची पर्स हिसकावून चोरटे पसार झाल्याची घटना समोर आली आहे. पर्समध्ये रोख रकमेसह महत्त्वाची कागदपत्रे असल्याची माहिती मिळत आहे. शनिवारी (12 ऑक्टोबर) सकाळी ही घटना घडली.

नवी दिल्ली - चोरीच्या घटना या सातत्याने समोर येत असतात. मात्र राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुतणीची पर्स हिसकावून चोरटे पसार झाल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी (12 ऑक्टोबर) सकाळी ही घटना घडली आहे. पर्समध्ये रोख रकमेसह महत्त्वाची कागदपत्रे असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भावाची मुलगी दमयंती बेन मोदी शनिवारी सकाळी अमृतसरहून दिल्लीला आल्या होत्या. दमयंती सिव्हील लाइन्स परिसरात असलेल्या गुजराती समाज भवनमध्ये राहणार होत्या. जुन्या दिल्लीहून ऑटो पकडून त्या आपल्या कुटुंबासोबत गुजरात समाज भवनला पोहोचल्या. त्याचवेळी ऑटोतून उतरत असताना स्कूटीवरून दोन जण आले आणि त्यांनी दमयंती यांची पर्स हिसकावून नेली.

दमयंती यांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्समध्ये जवळपास 56 हजार रुपयांची रोख रक्कम, दोन मोबाईल आणि महत्त्वाची कागदपत्रे होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेनंतर दिल्लीतील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारमधील आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्या घरी काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. जैन यांच्या स्वयंपाक घरातील आणि बाथरुममधील नळ तसेच शोभेच्या वस्तूही चोरांनी लंपास केल्या. सत्येंद्र यांनी रविवारी (22 सप्टेंबर) ट्विट करून याबाबत माहिती दिली होती. आरोग्यमंत्री जैन यांनी चोरीच्या घटनेनंतर आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्वीट केलं होतं. यामध्ये दिल्लीतील सरस्वती विहार परिसरात असणाऱ्या त्यांच्या घराचे काही फोटो पोस्ट केले होते. या फोटोमध्ये घरातील सामान अस्थावस्थ पडलेले दिसले. दिल्लीतील चोरांना पोलिसांची भीती राहिलेली नाही असं ही त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं होतं. 

हिमाचल प्रदेशचे परिवहन मंत्री गोविंद ठाकूर यांच्या पत्नीची दागिने आणि रोख रक्कम असलेली बॅग चोरीला गेल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली. गोविंद ठाकूर यांच्या पत्नी रजनी ठाकूर यांच्या बॅगेतील अडीच लाख रुपयांची रोख रक्कम आणि दागिने चोरांनी लंपास केल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, परिवहन मंत्री गोविंद ठाकूर यांच्या पत्नी रजनी चंदीगडच्या सेक्टर-8 मार्केटमध्ये शॉपिंगसाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांचा ड्रायव्हर गाडीतच बसला होता. चोरांनी ड्रायव्हरला तुमचे पैसे खाली पडले आहेत असं खोटं सांगितलं. गाडीबाहेर तुमच्या काही नोटा पडल्या आहेत असं सांगितल्यावर ड्रायव्हर गाडीबाहेर आला आणि याचाच फायदा घेत चोरांनी वस्तू आणि रक्कम लंपास केली. 


Web Title: pm narendra modi niece damayanti ben bag snatched in delhi civil lines
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.