सीतारामन यांची खुर्ची धोक्यात; अर्थसंकल्पानंतर अर्थमंत्री बदलणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 10:21 PM2020-01-29T22:21:58+5:302020-01-29T22:49:26+5:30

अर्थमंत्री बदलण्याचा संघाचा सल्ला; पंतप्रधान अर्थसंकल्पानंतर अर्थमंत्री बदलण्याची शक्यता

pm narendra modi likely to change finance minister after nirmala sitharaman presents budget | सीतारामन यांची खुर्ची धोक्यात; अर्थसंकल्पानंतर अर्थमंत्री बदलणार?

सीतारामन यांची खुर्ची धोक्यात; अर्थसंकल्पानंतर अर्थमंत्री बदलणार?

Next

नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या शनिवारी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मात्र अर्थमंत्री म्हणून हा त्यांचा शेवटचा अर्थसंकल्प ठरू शकतो. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्थमंत्री बदलण्याची शक्यता आहे. निर्मला सीतारामन यांना अर्थमंत्री पदावरुन हटवण्यात यावं, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मोदींना देण्यात आला आहे. त्यामुळे अर्थमंत्र्यांची खुर्ची धोक्यात असल्याचं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे. 

निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करतील. यानंतर त्यांना अर्थमंत्री पदावरुन दूर केलं जाऊ शकतं. तशा सूचना पंतप्रधान मोदींना संघाकडून देण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून अर्थसंकल्पाच्या दृष्टीनं अर्थ मंत्रालयाच्या महत्त्वाच्या बैठका सुरू आहेत. मात्र या बैठकांना निर्मला सीतारामन अनुपस्थित होत्या. त्यावरुन त्यांच्यावर बरीच टीकादेखील झाली होती. त्यामुळे आता सीतारामन यांना हटवून त्यांच्या जागी संघाच्या जवळच्या व्यक्तीची अर्थमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. 



निर्मला सीतारामन केवळ औपचारिक अर्थमंत्री आहेत. अर्थ मंत्रालयाची सूत्रं त्यांच्या हाती नाहीत, असा दावा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयाच्या, उद्योजकांच्या बैठका सुरू आहेत. मात्र या बैठकांना सीतारामन उपस्थित राहिलेल्या नाहीत. कारण त्या केवळ नामधारी आहेत. अर्थ मंत्रालयाची सर्व सूत्रं पंतप्रधान कार्यालयाकडे आहेत आणि ही बाब काळजी करण्यासारखी असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं.



अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांचा पहिला अर्थसंकल्प ५ जुलै २०१९ रोजी मांडला. मोदी सरकार-१ मध्ये सीतारामन यांनी उद्योगमंत्री (२६ मे २०१४ ते ३ सप्टेंबर २०१७) म्हणून काम पाहिलं. त्यानंतर त्यांच्याकडे संरक्षण मंत्रिपदाचा कार्यभार सोपवण्यात आला. ३ सप्टेंबर २०१७ ते ३० मे २०१९ दरम्यान त्यांनी संरक्षण मंत्रिपदाची धुरा सांभाळली. इंदिरा गांधींनंतर या पदाची पूर्णवेळ धुरा सांभाळणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. मोदी सरकार-२ मध्ये त्यांच्याकडे अर्थ मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. पूर्ण वेळ अर्थ मंत्रालयाचा कारभार पाहणाऱ्या पहिल्या महिला अर्थमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला.

Web Title: pm narendra modi likely to change finance minister after nirmala sitharaman presents budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.