दिल्लीत PM नरेंद्र मोदी अन् राज ठाकरे एकत्र; मुलगा अमित अन् नातू किआननं मोदींसोबत काढला फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 08:40 IST2025-12-07T08:38:51+5:302025-12-07T08:40:29+5:30
राज ठाकरे यांची सून मिताली ठाकरे यांच्या भावाचे दिल्लीत लग्न पार पडले. डॉ. राहुल बोराडे यांचा लग्नसोहळा दिल्लीत ५ डिसेंबरला पार पडला.

दिल्लीत PM नरेंद्र मोदी अन् राज ठाकरे एकत्र; मुलगा अमित अन् नातू किआननं मोदींसोबत काढला फोटो
नवी दिल्ली - राज्यातील राजकारणात सध्या ठाकरे बंधू एकत्र येण्याची दाट चर्चा आहे. त्यात भाजपा आणि शिंदेसेना यांच्यात संघर्ष वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. अशावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्ली दौऱ्यावर गेल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. राज ठाकरे यांचा दिल्ली दौरा हा राजकीय नव्हता तर एका कौटुंबिक लग्न सोहळ्यासाठी राज ठाकरे कुटुंबासह दिल्लीत पोहचले होते. मात्र या लग्न सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज राजकीय मंडळींनी हजेरी लावली. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे लग्न सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आल्याचं समोर आले.
राज ठाकरे यांची सून मिताली ठाकरे यांच्या भावाचे दिल्लीत लग्न पार पडले. डॉ. राहुल बोराडे यांचा लग्नसोहळा दिल्लीत ५ डिसेंबरला पार पडला. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली होती. पंतप्रधान मोदी स्टेजवर आले असताना तिथे फोटोसेशन सुरू होते. त्याचवेळी अमित ठाकरे मुलगा किआनला घेऊन स्टेजवर गेले. अमित ठाकरे पंतप्रधानांच्या जवळ जाताच त्यांनी किआन ठाकरे यांचे गाल ओढले. त्यानंतर किआनसोबत अमित ठाकरे यांनी पंतप्रधानांसोबत कौटुंबिक फोटो काढला. या लग्नसोहळ्यातील एक व्हिडिओ क्लीप समोर आली आहे. त्यात मोदी किआन ठाकरेंचे गाल ओढताना दिसत आहेत.
नरेंद्र मोदी-राज ठाकरे भेट?
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या लग्न सोहळ्याला राज ठाकरे यांनी दिल्लीत हजेरी लावली. दिल्लीतील हॉटेल हयातमध्ये हा लग्नसोहळा पार पडला. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली. या लग्नाला पंतप्रधानांच्या हजेरीने सर्वांचे लक्ष वेधले. या लग्नात नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची भेट झाल्याचेही सांगितले जात आहे. परंतु त्यांच्या भेटीचा फोटो अथवा व्हिडिओ कुठेही समोर आला नाही. मात्र अमित ठाकरे आणि किआन ठाकरे यांच्यासोबत कौटुंबिक फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
ठाकरे बंधूचं भाजपाला आव्हान
दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित येणार असल्याची चर्चा आहे. दोन्ही पक्षाकडून वारंवार तसे संकेत दिले जात आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू भाजपाला आव्हान देत आहेत. मात्र दुसरीकडे राज्यातील राजकारणात शिंदेसेना आणि भाजपा यांच्यातील संघर्ष वाढल्याचे चित्र आहे. त्याशिवाय एका लग्न सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांच्यात १५-२० मिनिटे चर्चा झाल्याचंही समोर आले होते. त्यात आता दिल्लीत राज ठाकरे आणि मोदी यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.