गांधीवादी विचारांचे पाईक, 103 वर्षीय स्वातंत्र्य सैनिकाची कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 09:07 AM2021-05-13T09:07:32+5:302021-05-13T09:10:50+5:30

5 दिवसांपूर्वी मला कोरोनाची लक्षणं जाणवत होती, पण शारीरिक त्रास अजिबात होत नव्हता. तरीही, मी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला. आता, मी बरा असून रुग्णालयातून डिस्चार्जही घेतला आहे.

Pike of Gandhian thought, 103-year-old freedom fighter H.S. doreswamy defeats Corona | गांधीवादी विचारांचे पाईक, 103 वर्षीय स्वातंत्र्य सैनिकाची कोरोनावर मात

गांधीवादी विचारांचे पाईक, 103 वर्षीय स्वातंत्र्य सैनिकाची कोरोनावर मात

Next
ठळक मुद्दे डोरेस्वामी हे कर्नाटकमधील गांधीवादी विचारांचे मोठे सामाजिक कार्यकर्ते आहेत. वयाच्या शंभरीनंतरही ते सामाजिक कार्यात हिरिरीने सहभागी होतात. कर्नाटकमधील 'चलो म्हैसूर' आंदोलनालाही त्यांच्यामुळेच मोठी ताकद मिळाली होती

मुंबई - देशात कोरोना महामारीचा दुसरा स्ट्रेन अतिशय घातक सिद्ध होत असून रुग्णाच्या मृत्यूच्या बातम्यांनी मन सुन्न होत आहे. सोशल मीडियावरही भावपूर्ण श्रद्धांजलीच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. गावागावात परिस्थिती बिकट असून ऑक्सिजन बेड आणि इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण फिरावे लागत आहे. त्यातच, कोरोना रुग्णांना मदत करणाऱ्यांची बातमी मनाला दिलासा देते, तर कधी शतकी गाठलेल्या आजी-आजोबाने कोरोनावर मात केल्याची बातमी कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये सकारात्मकता आणते. नुकतेच, गांधीवादी विचारांचे स्वातंत्र्य सेनानी एस.एस. डोरस्वामी यांनी वयाच्या 103 व्या वर्षी कोरोनावर मात केलीय.  

5 दिवसांपूर्वी मला कोरोनाची लक्षणं जाणवत होती, पण शारीरिक त्रास अजिबात होत नव्हता. तरीही, मी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला. आता, मी बरा असून रुग्णालयातून डिस्चार्जही घेतला आहे, असे डोरेस्वामी यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले. श्री जयदेवा इंस्टीट्यू ऑफ कॉर्डिओव्हॉस्कलर सायन्स अँड रिसर्च या सरकारी रुग्णालयात डोरेस्वामी यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या रुग्णालयाचे प्रमुख आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे जावई असलेले डॉ. सी.एन. मंजूनाथ हे वैयक्तिकपणे डोरेस्वामी यांच्या प्रकृतीची काळजी घेत त्यांच्यावर उपचार करत होते. डोरेस्वामी यांनी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनाला मात देऊन वयाच्या शंभरीनंतरही आपण कोरोनातून बरे होऊ शकतो, असा संदेशच समाजाला दिला आहे.  

डोरेस्वामी हे कर्नाटकमधील गांधीवादी विचारांचे मोठे सामाजिक कार्यकर्ते आहेत. वयाच्या शंभरीनंतरही ते सामाजिक कार्यात आणि आंदोलनात हिरिरीने सहभागी होतात. कर्नाटकमधील 'चलो म्हैसूर' आंदोलनालाही त्यांच्यामुळेच मोठी ताकद मिळाली होती. 10 एप्रिल 1918 रोजी म्हैसूरच्या हारोहाली गावात त्यांचा जन्म झाला. ते 5 वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर, आजी-आजोबांनीच त्यांचा सांभाळ केला. वयाच्या 15 व्या वर्षी त्यांनी महात्मा गांधींच्या जीवनावरील पुस्तक वाचले अन् त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. तेथून आजतागायत ते गांधी विचाराने प्रेरीत आहेत. महात्मा गांधींच्या भारत छोडो आंदोलनातही त्यांचा सहभाग होता. या काळात त्यांना तुरुंगावास भोगावा लागला. स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचा अनुभव सांगताना नेहमीच त्यांच्यातील क्रांतीकारी आजही जागा होता. त्यांचा प्रामाणिकपणा हीच त्यांची सर्वात मोठी ताकद आणि दबदबा आहे. 
 

Read in English

Web Title: Pike of Gandhian thought, 103-year-old freedom fighter H.S. doreswamy defeats Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.