पेट्रोलने शंभरी पार करताच भाजपा मंत्र्याने मानले पंतप्रधान मोदींचे आभार, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 02:32 PM2021-02-19T14:32:59+5:302021-02-19T14:35:36+5:30

Petrol Price Hike And Vishvas Sarang : अधिक कर असलेले ब्रँडेड आणि उच्च दर्जाचे पेट्रोल महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांत याआधीच 100 रुपयांच्या वर गेले आहे.

petrol price hike mp minister vishvas sarang congratulates pm modi over renewable energy | पेट्रोलने शंभरी पार करताच भाजपा मंत्र्याने मानले पंतप्रधान मोदींचे आभार, म्हणाले...

पेट्रोलने शंभरी पार करताच भाजपा मंत्र्याने मानले पंतप्रधान मोदींचे आभार, म्हणाले...

Next

नवी दिल्ली - पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. आता पुन्हा एकदा सलग अकराव्या दिवशी इंधन दरवाढ करण्यात आली आहे. राजस्थानात पेट्रोलचा दर बुधवारी प्रतिलिटर 100 रुपयांपेक्षा अधिक झाला. तर मध्य प्रदेशातही शंभरी पार गेलं आहे. अधिक कर असलेले ब्रँडेड आणि उच्च दर्जाचे पेट्रोल महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांत याआधीच 100 रुपयांच्या वर गेले आहे. नियमित पेट्रोल मात्र प्रथमच शंभरी पार गेले आहे. याच दरम्यान पेट्रोलने शंभरी पार केल्यानंतर भाजपाच्या एका मंत्र्याने पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. 

मध्य प्रदेशचे वैद्यकीय शिक्षणमंत्री असणाऱ्या विश्वास सारंग यांनी वाढत्या इंधनदरांमुळे नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं आहे. तसेच यामागचं कारण देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. पंतप्रधानांनी सौरऊर्जा आणि इलेक्ट्रॉनिक ऊर्जेचा वापर करण्यास प्रोत्साहन दिल्याने त्यांचे आभार मानायला हवेत असं विश्वास सारंग यांनी म्हटलं आहे. तसेच वाढत्या इंधनदरावरील कर कमी करून नागरिकांना ते उपलब्ध करता येऊ शकते का? असा सवाल विश्वास सारंग यांना करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी असं म्हटलं आहे. इंधन दराचे 'अच्छे दिन' संपले असून देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेल महागले आहे. 

"मला पंतप्रधानांचे अभिनंदन करायचे आहे. वाहतुकीसाठी सौर ऊर्जेचा वापर करण्यासोबत तेलाच्या आंतरराष्ट्रीय किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी व्यवस्था तयार केली आहे. मोदींच्या इलेक्ट्रॉनिक वाहने आणण्याच्या निर्णयामुळे तेलाच्या किंमतीवरील आपले नियंत्रण अधिक मजबूत होईल. आंतराष्ट्रीय बाजारात मागणी आणि पुरवठ्यामुळे तेलाचे दर कमी होतात. अशा परिस्थितीत जर आपण मागणी कमी केली तर तेलाच्या किंमतींवर आपले नियंत्रण असेल म्हणूनच मोदींनी इलेक्ट्रिक वाहने आणण्याचा निर्णय घेतला आहे. तेलाच्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यात आपण सक्षम बनू" असं विश्वास सारंग यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

पेट्रोलच्या विक्री किमतीतील 60 टक्के रक्कम केंद्र व राज्य सरकारच्या करात जाते. डिझेलच्या विक्री किमतीत कराचा वाटा 54 टक्के आहे. देशात जीएसटी लागू झाला त्यावेळी पेट्रोलियम पदार्थ त्यामधून वगळण्यात आले. कारण, जीएसटी लागू केल्यास राज्यांना त्यावर अन्य उपकर लावता येणार नव्हते, त्यामुळे राज्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत घटणार होता. मात्र, पेट्रोलियम पदार्थ जीएसटीमध्ये आणण्याची मागणी सातत्याने होत असूनही सरकारकडून त्याकडे कायमच दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार आहे. व्हॅटसारखे स्थानिक कर आणि वाहतूक खर्च यामुळे पेट्रोल- डिझेलचे दर प्रत्येक राज्यात भिन्न आहेत. राजस्थानात पेट्रोलवर सर्वाधिक व्हॅट आहे. 

पेट्रोलच्या दराने गाठली 'शंभरी' अन् पंपचालकांनी लगेचच थांबवली विक्री; जाणून घ्या कारण

पेट्रोलच्या दराने 'शंभरी' गाठली असून पंपचालकांनी लगेचच विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमध्ये इंधनाच्या किमतीत वाढ झाल्यानंतर लगेचच जुन्या पेट्रोल पंपावर प्रीमियम पेट्रोलची विक्री बंद करण्यात आली आहे. प्रीमियम पेट्रोलचा दर हा प्रति लीटर तब्बल 100 रुपयांच्या वर गेला आहे. पेट्रोल पंपावर असलेल्या जुन्या मशीनमध्ये तीन डिजिट दाखवले जात नाही आहेत. त्यामुळेच साध्या पेट्रोलचा दर हा प्रति लीटर 100 च्या वर गेल्यानंतर देखील अनेक पेट्रोल पंपावर त्याची विक्री बंद करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी पेट्रोलचे भाव वाढल्यानंतर सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बुधवारी संसदेत पेट्रोलियम उत्पादनांवर उत्पादन शुल्क कमी करण्याचा सध्या कोणताही विचार नसल्याचं म्हटलं आहे.



 

Web Title: petrol price hike mp minister vishvas sarang congratulates pm modi over renewable energy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.