पेट्रोल ९.५०, डिझेल ७ रुपयांनी स्वस्त; केंद्र सरकारकडून मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 05:47 AM2022-05-22T05:47:52+5:302022-05-22T05:48:44+5:30

गेल्या काही महिन्यामध्ये पेट्राेल आणि डिझेलच्या किमती सर्वकालीन उच्चांकी पातळीवर आहेत.

Petrol at Rs 9.50, diesel at Rs 7 cheaper; Great relief from the central government and modi sarkar | पेट्रोल ९.५०, डिझेल ७ रुपयांनी स्वस्त; केंद्र सरकारकडून मोठा दिलासा

पेट्रोल ९.५०, डिझेल ७ रुपयांनी स्वस्त; केंद्र सरकारकडून मोठा दिलासा

Next

नवी दिल्ली : इंधनाच्या भडकलेल्या किमती आणि महागाईमुळे हाेरपळलेल्या जनतेला केंद्र सरकारने माेठा दिलासा दिला आहे. सरकारने पेट्राेल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे ८ आणि ६ रुपये प्रति लिटर कपात करण्याची घाेषणा केली. तसेच उज्ज्वला याेजनेतील लाभार्थ्यांना घरगुती गॅसवर प्रति सिलिंडर २०० रुपये अनुदान देण्याचेही सरकारने जाहीर केले. याशिवाय किमती कमी करण्यासाठी काही उत्पादनांवरील आयात शुल्कातही कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्राेल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कपात जाहीर केली. महागाई कमी करण्याच्या दृष्टीने प्लास्टिक व स्टीलच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील आयात शुल्कात कपात करण्यात येणार आहे. तर काही स्टील उत्पादनावर निर्यात शुल्क आकारण्यात येणार आहे. सिमेंटच्या वाढलेल्या किमती कमी करण्यासाठी मालवाहतुकीत सुधारणा करण्यात येतील, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. 

गेल्या काही महिन्यामध्ये पेट्राेल आणि डिझेलच्या किमती सर्वकालीन उच्चांकी पातळीवर आहेत. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल ११० डाॅलर्स प्रति बॅरलवर पाेहाेचले आहे. तर दुसरीकडे घरगुती गॅसच्या किमतीही देशभरात १ हजार रुपये प्रति सिलिंडरवर गेल्या आहेत. याशिवाय सरकारने सीएनजीच्या किमतीमध्येही वर्षभरात माेठी वाढ केली आहे. त्यामुळे महागाई प्रचंड वाढली असून सर्वसामान्य जनतेचे बजेट पूर्णपणे काेलमडले हाेते.

- महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने शुल्क कपात केली आहे.

- घाउक महागाईचा दर सध्या १५.०८ टक्क्यांवर आहे. 

- गेल्या ८ वर्षांमधील हा उच्चांकी दर असून १९९८ नंतर प्रथमच ताे १५ टक्क्यांवर गेला आहे.
- सरकारने मार्च २०२० आणि मे २०२० या कालावधीत पेट्राेल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे १३ आणि १६ रुपयांची वाढ केली. नाेव्हेंबर २०२१ आणि आताच्या कपातीमुळे ती वाढ पूर्णपणे मागे घेण्यात आली आहे.

केरळकडून व्हॅटमध्ये कपात

केंद्राने शुल्ककपात जाहीर केल्यानंतर केरळने सर्वप्रथम पेट्राेल आणि डिझेलवर अनुक्रमे २.४१ आणि १.३६ रुपये प्रतीलीटर एवढा व्हॅट कमी केला आहे. केरळमध्ये पेट्राेलवर सध्या ३१.८ टक्के व्हॅट व १ रुपये अधिभार आकारण्यात येताे.

प्रतिलिटरमागे उत्पादन शुल्क

दिनांक    पेट्राेल     डिझेल
१ एप्रिल २०१४     ९.४८     ३.५६
२ जानेवारी २०१५     १५.४०     ८.२०
२ जानेवरी २०१६     १९.७३     १३.८३
४ ऑक्टाेबर २०१७     १९.४८     १५.३३
६ जुलै २०१९     १७.९८     १३.८३
६ मे २०२०     ३२.९०     ३१.८०
३ नाेव्हेंबर २०२१     २७.९०     २१.८०

असे असतील नवे दर (रुपयांमध्ये) 

शहर     पेट्राेल         डिझेल
    नवे दर     जुने दर    नवे दर     जुने दर
नवी दिल्ली     ९५.९१     १०५.४१    ८९.६७     ९६.६७
मुंबई     १११.०१    १२०.५१    ९७.७७     १०४.७७
काेलकाता     १०५.६२    ११५.१२    ९२.८३     ९९.८३
चेन्नई     १०१.३५    ११०.८५    ९३.९४    १००.९४
बंगळुरु     १०१.५९    १११.०९    ८७.७९    ९४.७९
हैदराबाद     १०९.९९    ११९.४९    ९८.४९    १०५.४९

आजच्या निर्णयामुळे विविध क्षेत्रांवर परिणाम हाेणार असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.  याशिवाय उज्ज्वला अनुदानामुळे कुटुंबियांना बजेटमध्ये माेठा दिलासा मिळेल.    - नरेंद्र माेदी, पंतप्रधान

सर्व राज्यांनी विशेषत: नाेव्हेंबरमध्ये ज्यांनी व्हॅट कमी केला नव्हता, त्यांनी ताे कमी करुन जनतेला दिलासा दिला आहे.     - निर्मला सीतारामन, अर्थमंत्री

जनतेला मूर्ख बनवू नका. युपीए सरकारच्या काळात जेवढे शुल्क हाेते, त्या पातळीवर ते आणायला हवे.    - रणदीप सुरजेवाला, प्रवक्ते काॅंग्रेस

नाममात्र देखावा नको 

पेट्रोल, डिझेलवरील अबकारी कर आणखी कमी करायला हवा. केंद्राने दोन महिन्यांपूर्वी पेट्रोलवरचा अबकारी कर प्रति लिटर १८.४२ रु. इतका वाढविला. आज तो ८ रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली. डिझेलवरील अबकारी कर १८ रुपये २४ पैशांनी वाढविला. आता ६ रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली. आधी किंमती वाढवायच्या, नंतर नाममात्र कमी करायच्या हे बरोबर नाही.     - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
 

Web Title: Petrol at Rs 9.50, diesel at Rs 7 cheaper; Great relief from the central government and modi sarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.