चीन भारतात घुसला; 56 इंची छातीचा देशाला काय उपयोग? खरगेंचा पीएम मोदींवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 15:55 IST2025-12-09T15:54:56+5:302025-12-09T15:55:33+5:30
Parliament Winter Session: 'वंदे मातरम्'वरील चर्चेदरम्यान खरगेंनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाहांवर इतिहासाचे विकृतीकरण केल्याचा आरोप केला.

चीन भारतात घुसला; 56 इंची छातीचा देशाला काय उपयोग? खरगेंचा पीएम मोदींवर निशाणा
Parliament Winter Session: संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान, काँग्रेस अध्यक्ष व राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी सरकारवर तीव्र हल्ला चढवला. त्यांनी आरोप केला की, चीन लडाखमध्ये घुसला आहे, पण सरकार त्याला थांबवण्याची किंवा त्याच्याविरुद्ध बोलण्याचीही हिंमत करत नाही. त्यांनी व्यंगात्मक भाषेत विचारले की, 56 इंची छातीचा देशाला काय फायदा झाला? खरगेंच्या या वक्तव्यावर भाजप सदस्यांनी जोरदार निषेध नोंदवला.
वंदे मातरमवरून राजकीय वादंग...
खरगे पुढे म्हणाले की, ते मागील 60 वर्षांपासून वंदे मातरम गात आहेत. ज्यांनी कधी वंदे मातरम गायले नाही, तेच आता त्याचा राजकीय वापर करत आहेत. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेसने आपल्या अधिवेशनांमध्ये वंदे मातरम गाण्याची परंपरा सुरू केली होती. स्वातंत्र्यसैनिक जेलमध्ये जात होते. जे आज देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटत आहेत, ते त्या काळी इंग्रजांची नोकरी करत होते, असा थेट टोलाही त्यांनी लगावला.
LIVE: Congress President & LoP in Rajya Sabha Shri @kharge speaks on the 150th anniversary of 'Vande Mataram' https://t.co/aeiZnQXcH6
— Congress (@INCIndia) December 9, 2025
इतिहास मोडतोड...
खरगेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह मंत्री अमित शाह यांच्यावर इतिहासाचे विकृतीकरण केल्याचा आरोप केला. ते म्हणाले, वंदे मातरमविषयीचा निर्णय नेहरू, गांधी, मौलाना आझाद आणि सुभाषचंद्र बोस यांच्या सामूहिक चर्चेनंतर घेण्यात आला होता. आज इतिहास उलटवून काँग्रेसला अपमानित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अर्थव्यवस्था संकटात आहे, बेरोजगारी वाढतेय, मात्र लक्ष विचलित करण्यासाठी सरकार वंदे मातरम पुढे आणत आहे
खर्गेंनी पीएम मोदींवर टीका करताना 1937 चा संदर्भ दिला. त्यांनी म्हटले की, मोदी म्हणतात नेहरूंनी वंदे मातरमच्या काही ओळी काढल्या. पण जेव्हा तुमच्या पक्षाने मुस्लिम लीगसोबत मिळून बंगालमध्ये सरकार स्थापन केले, तेव्हा काय झाले? तेव्हा देशभक्ती कुठे होती? बांग्लादेश पाकिस्तानकडे झुकतोय, चीन भारतीय भूमिवर दावा करतोय... पण सरकार शांत आहे. एका भारतीय महिलेचा शांघायमध्ये 18 तास ताबा ठेवण्यात आला, तरीही सरकार चीनविरोधात एक शब्द बोलत नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.