“आम्हाला EVM मशीन एकदा पाहायला हवे”; राहुल गांधींची लोकसभेत मागणी, मतचोरीचा मुद्दा उपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 17:40 IST2025-12-09T17:39:15+5:302025-12-09T17:40:16+5:30
Rahul Gandhi In Lok Sabha: राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलताना मतचोरीचा मुद्दा मांडत सत्ताधारी पक्षावर टीका केली.

“आम्हाला EVM मशीन एकदा पाहायला हवे”; राहुल गांधींची लोकसभेत मागणी, मतचोरीचा मुद्दा उपस्थित
Rahul Gandhi In Lok Sabha: गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी मतचोरीचा मुद्दा उपस्थित करत आहेत. पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांनी कशा प्रकारे मतचोरी केली जात आहे, याची काही उदारहणे दिली. निवडणूक आयोग, निवडणूक आयुक्त आणि निवडणूक प्रक्रिया यावर अनेक प्रश्न उपस्थित केले. राहुल गांधी यांचे सगळे दावे निवडणूक आयोगाने फेटाळूनही लावले. संसदेच्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत बोलताना राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मतचोरीचा मुद्दा मांडत, ईव्हीएम मशीन आम्हाला एकदा पाहायला द्या, अशी मागणी केली.
निवडणूक सुधारणा आवश्यक आहेत. निवडणुकीच्या एक महिना आधी सर्व राजकीय पक्षांना मशीन-रीडेबल मतदार याद्या देण्यात याव्यात. सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्याविरुद्धचा कायदा बदलला पाहिजे. आम्हाला ईव्हीएम पाहण्याची परवानगी दिली पाहिजे. मतांची चोरी ही देशविरोधी आहे. आपण एक महान लोकशाही आहोत. सरकारला निवडणूक सुधारणा नको आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
आम्ही हरियाणा आणि महाराष्ट्रात मतदान चोरी सिद्ध केली
हरियाणात एका ब्राझिलियन महिलेचा फोटो २२ वेळा मतदार यादीत आला आहे. हा निवडणूक चोरीचा प्रश्न आहे. बिहारमध्ये एसआयआर नंतर मतदार यादीत ०१ लाख २२ हजार डुप्लिकेट फोटो दिसले. हे कसे घडले? आम्ही हरियाणा आणि महाराष्ट्रात मतदान चोरी सिद्ध केली, असा दावा राहुल गांधी यांनी केला. देशातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू हे आरएसएसचे आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशातील सर्व संस्थांवर नियंत्रण आणू पाहत आहे, असे सांगत राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला. राहुल गांधी यांनी संघाचे नाव घेताच सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी यावर आक्षेप घेतला. याला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, मी काहीही चुकीचे बोललो नाही. शैक्षणिक संस्था ताब्यात घेतल्या आहेत. कुलगुरूंची नियुक्ती गुणवत्तेवर नव्हे तर एका संस्थेशी संलग्नतेवर आधारित करण्यात आली आहे. CBI आणि ED एकाच संस्थेशी संबंधित व्यक्तींनी ताब्यात घेतले आहेत. देशातील निवडणुका नियंत्रित करणारी तिसरी संस्था, निवडणूक आयोग दुसऱ्या संस्थेद्वारे नियंत्रित केली जाते. माझ्याकडे याचे पुरावे आहेत, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.
दरम्यान, लोकशाहीचे नुकसान करण्यासाठी भाजपा निवडणूक आयोगाचा वापर करत आहे. सरन्यायाधीशांना निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती प्रक्रियेतून काढून टाकण्यात आले. मी तिथे बसलो होतो. एका बाजूला पंतप्रधान मोदी, अमित शाह होते आणि दुसऱ्या बाजूला मी होतो. कोणत्याही पंतप्रधानाने हे केले नाही. डिसेंबर २०२३ मध्ये नियम बदलण्यात आले. त्यानुसार, कोणत्याही निवडणूक आयुक्तांना शिक्षा होऊ शकत नाही, अशी तरतूद होती. हे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या अगदी आधी करण्यात आले. सीसीटीव्ही आणि डेटाबाबतचे नियम बदलण्यात आले. निवडणूक आयोग सरकारशी सुसंगत काम करत आहे. हा डेटाचा प्रश्न नाही तर निवडणुकांचा आहे, या शब्दांत राहुल गांधी यांनी निशाणा साधला.