"नवऱ्याने दिला धोका, भारतात दुसरं लग्न..."; पाकिस्तानी महिलेने पंतप्रधान मोदींकडे मागितला न्याय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 15:38 IST2025-12-07T15:37:39+5:302025-12-07T15:38:31+5:30
कराचीमध्ये राहणाऱ्या निकिता नागदेवने तिचा पती विक्रम नागदेववर गंभीर आरोप करत एक भावनिक व्हिडीओ मेसेज जारी केला आहे.

"नवऱ्याने दिला धोका, भारतात दुसरं लग्न..."; पाकिस्तानी महिलेने पंतप्रधान मोदींकडे मागितला न्याय
कराचीमध्ये राहणाऱ्या निकिता नागदेवने तिचा पती विक्रम नागदेववर गंभीर आरोप करत एक भावनिक व्हिडीओ मेसेज जारी केला आहे. निकिताने दिलेल्या माहितीनुसार, तिचं लग्न २६ जानेवारी २०२० रोजी कराची येथे हिंदू पद्धतीने झालं होतं. लग्नाच्या एका महिन्यानंतर २६ फेब्रुवारी २०२० रोजी विक्रम तिला भारतात घेऊन आला, परंतु काही महिन्यांतच तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं. त्यानंतर आता निकीताने मोदींकडे न्याय मागितला आहे.
९ जुलै २०२० रोजी विक्रम तिला "व्हिसा टेक्निकल समस्येचं" कारण देऊन अटारी सीमेवर घेऊन गेला आणि जबरदस्तीने तिला पाकिस्तानला परत पाठवलं. त्यानंतर त्याने तिला परत आणण्याचा प्रयत्न केला नाही किंवा कोणतीही जबाबदारी पार पाडली नाही. व्हिडिओमध्ये निकिता म्हणाली, "मी त्याला वारंवार भारतात परत बोलवण्यासाठी विनंती केली, पण त्याने प्रत्येक वेळी नकार दिला. जर मला आज न्याय मिळाला नाही तर महिलांचा व्यवस्थेवरील विश्वास उडेल."
निकिता आरोप करते की, लग्नानंतर तिच्या सासरच्या लोकांचं वागणं लगेचच बदललं. तिला समजलं की, विक्रमचे तिच्या एका महिलेशी प्रेमसंबंध आहेत. तिने तक्रार केल्यावर, तिच्या सासरच्यांनी हे प्रकरण सामान्य असल्याचं सांगत फेटाळून लावलं आणि नंतर ते दाबून टाकलं. कोरोना लॉकडाऊन दरम्यान, विक्रमने तिला पाकिस्तानला परतण्यास भाग पाडलं आणि तेव्हापासून तो तिला भारतात येण्यापासून रोखत आहे. नवऱ्याने धोका दिला, तो आता भारतात दुसरं लग्न करत आहे.
निकिताने २७ जानेवारी २०२५ रोजी लेखी तक्रार दाखल केली. हे प्रकरण मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने अधिकृत केलेल्या सिंधी पंचायत मध्यस्थी आणि कायदेशीर परिषद केंद्राकडे पोहोचलं. नोटीस बजावण्यात आली, सुनावणी घेण्यात आल्या, परंतु तोडगा निघाला नाही. ३० एप्रिल २०२५ रोजी जारी केलेल्या रिपोर्ट असे म्हटलं होतं की दोन्गी पक्ष भारतीय नागरिक नाहीत आणि म्हणूनच हा खटला पाकिस्तानच्या अधिकारक्षेत्रात येतो. केंद्राने विक्रमला पाकिस्तानला पाठवण्याची शिफारस केली.
यापूर्वी, मे २०२५ मध्ये, इंदूर सोशल पंचायतीने देखील विक्रमला पाकिस्तानला पाठवण्याची शिफारस केली होती. जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी पुष्टी केली की चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत आणि रिपोर्टच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. निकिता भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदत मागत आहे. "प्रत्येक महिलेला न्याय मिळाला पाहिजे. मी न्यायाची वाट पाहत आहे" असं म्हटलं आहे.