'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 09:13 IST2025-05-20T09:12:25+5:302025-05-20T09:13:47+5:30
परराष्ट्र व्यवहारविषयक संसदीय समितीला माहिती...

'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
नवी दिल्ली : भारत व पाकिस्तानमधील यावेळची लढाईदेखील पारंपरिक पद्धतीनेच झाली. अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकिस्तानने दिला नव्हता, असे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सोमवारी परराष्ट्र व्यवहारविषयक संसदीय समितीला सांगितले.
भारत व पाकिस्तानमधील संघर्ष थांबविण्यासाठी अमेरिकेने महत्त्वाची भूमिका बजावली, असे त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते. त्यासंदर्भात संसदीय समितीतील विरोधी पक्षांच्या खासदारांनी प्रश्न उपस्थित केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्या प्रश्नांना उत्तर देताना मिस्री म्हणाले की, शस्त्रसंधी करण्याचा निर्णय द्विपक्षीय चर्चेतून घेण्यात आला. पाकिस्तानने कोणाची मदत घेतली हे महत्त्वाचे नाही. भारताने पाकिस्तानी हवाई तळांवर जोरदार हल्ले करून त्या देशाला नामोहरम केले.
तुर्कस्तान हा भारताचा कधीही समर्थक नव्हता
ही बैठक काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी, काँग्रेसचे राजीव शुक्ला आणि दीपेंद्र हुड्डा, एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी, भाजपच्या अपराजिता सारंगी आणि अरुण गोविल यांच्यासह अनेक खासदार उपस्थित होते.
पहलगाम हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ ही कारवाई केली. पाकिस्तानातील तुर्कस्तान हा भारताचा कधीही समर्थक नव्हता, असे मिस्री यांनी संसदीय समितीला सांगितले.
तृणमूलचे युसूफ पठाण यांची दौऱ्यातून माघार
विविध देशांत जाणाऱ्या खासदारांच्या शिष्टमंडळांमध्ये समाविष्ट असलेले तृणमूल काँग्रेसचे खासदार युसूफ पठाण यांनी या दौऱ्यातून माघार घेतली आहे. पठाण यांनी या दौऱ्यावर बहिष्कार घातलेला नाही. मात्र त्याचे कारण त्यांनी दिलेले नाही.
जनता दल (यू) चे खासदार संजय झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात त्यांचा समावेश होता. हे शिष्टमंडळ इंडोनेशिया, मलेशिया, दक्षिण कोरिया, जपान आणि सिंगापूर या देशांमध्ये जाणार होते.
मिस्री यांना ट्रोल केले; खासदारांकडून निषेध
‘ऑपरेशन सिंदूर’ स्थगित केल्यानंतर विक्रम मिस्री यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. त्याचा परराष्ट्र व्यवहारविषयक संसदीय समितीतील सर्व सदस्यांनी एकमताने निषेध केला. मिस्री यांनी जे अहोरात्र काम केले त्याचे या सदस्यांनी कौतुक केले.