लढाईला मिळतंय यश, कोरोनावर मात करुन 95,527 रुग्णांची घरवापसी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 05:59 PM2020-06-02T17:59:51+5:302020-06-02T18:00:30+5:30

देशातील कोरोना बाधितांची संख्या पावणे दोन लाखांच्या पुढे गेली आहे. मृतांचा आकडा ५ हजारांहून अधिक आहे. त्यावर कोविड-१९ टास्क फोर्सनंही एक अहवाल दिला आहे.

Overcoming Corona and returning 95,527 patients, the battle is a success MMG | लढाईला मिळतंय यश, कोरोनावर मात करुन 95,527 रुग्णांची घरवापसी

लढाईला मिळतंय यश, कोरोनावर मात करुन 95,527 रुग्णांची घरवापसी

Next

नवी दिल्ली - कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत असून, केंद्रासह राज्य सरकारही कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. राज्यात लॉकडाऊन असला तरी अनेक नियम शिथिल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक कामासाठी बाहेर जाताना सरकारनंही काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. राज्यात आज ७७९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, देशात आत्तापर्यंत ९५,५२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली. दरम्यान, देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आत्तापर्यंत पावणेदोन लाखांच्या घरात पोहोचली आहे. 

देशातील कोरोना बाधितांची संख्या पावणे दोन लाखांच्या पुढे गेली आहे. मृतांचा आकडा ५ हजारांहून अधिक आहे. त्यावर कोविड-१९ टास्क फोर्सनंही एक अहवाल दिला आहे. 'घरी परतणारे मजूर आता देशाच्या कानाकोपऱ्यात कोरोना विषाणू घेऊन जात आहेत. स्वगृही परतलेल्या मजुरांमुळे कोरोना ग्रामीण आणि निमशहरी भागांत पोहोचला आहे. त्यामुळे अतिशय कमी रुग्ण असलेल्या भागांतील रुग्णांची संख्या वाढ लागली आहे. आरोग्य व्यवस्था अतिशय कमकुवत असलेल्या जिल्ह्यांमध्ये रुग्णांचं प्रमाण वाढलं आहे,' असं टास्क फोर्सनं अहवालात नमूद केलं आहे.

 देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच राज्यात सोमवारी २३६१ कोरोनाबाधितांची नोंद झालेली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या ७०,०१३वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे राज्यामध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मार्चच्या तुलनेत मेमध्ये सुमारे साडेतीन पटीने वाढून ४३.३५ टक्के एवढे झाले आहे. गेल्या तीन महिन्यांची आकडेवारी पाहता मेमध्ये सर्वाधिक रुग्ण बरे झालेले दिसून येत आहेत. यासोबतच राज्यातील रुग्ण दुपटीचा कालावधी (डबलिंग रेट) ११ वरून १७.५ दिवसांवर गेला आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील पहिले रुग्ण आढळल्यानंतर ३१ मार्च अखेर राज्यात ३०२ रुग्ण होते त्यातील ३९ रुग्ण बरे झाले. म्हणजे मार्च महिन्यात कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण १२.९१ टक्के एवढे होते.

देशात आत्तापर्यंत ९५,५२७ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून अद्यापही ९० हजारांच्या आसपास रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दुसरीकडे कोरोना चाचण्या होताच, रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे, नवीन रुग्णांची संख्या रोखणे हे प्रशासनापुढे मोठे आव्हान आहे. देशात २५ मार्च ते ३० मे या कालावधीत अतिशय कठोर लॉकडाऊन पाळण्यात आला. मात्र तरीही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. २५ मार्चला देशातील कोरोना रुग्णांची संख्या ६०६ इतकी होती. तीच संख्या २४ मे रोजी १ लाख ३८ हजार ८४५ वर पोहोचली, असं टास्क फोर्सनं आपल्या अहवालात म्हटलं आहे. धोरणकर्ते प्रशासकीय अधिकाऱ्यांवर अवलंबून राहिले. त्याची जबरदस्त किंमत आज देशाला मोजावी लागत आहे. यामुळे आरोग्य आणि मानवतेवरचं संकट आलं आहे, असंदेखील अहवालात म्हटलं आहे. लॉकडाऊनची घोषणा करण्यापूर्वी मजुरांना त्यांची घरी जाण्याची परवानगी देण्यात आली असती, तर देशातील कोरोना रुग्णांचा आकडा सध्या इतका वाढला नसता, असं मत आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. विशेष म्हणजे हे तज्ज्ञ एम्स, जेएनयू, बीएचयूसारख्या अग्रगण्य संस्थांमधील असून त्यांचा समावेश कोविड-१९ टास्क फोर्समध्ये होतो.
 

Web Title: Overcoming Corona and returning 95,527 patients, the battle is a success MMG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.