nta jee main exam to be conducted in more regional languages | JEE Main 2021 : जेईई मेन परीक्षा आता प्रादेशिक भाषांमध्ये होणार; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

JEE Main 2021 : जेईई मेन परीक्षा आता प्रादेशिक भाषांमध्ये होणार; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली - जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम (JEE Main) संबंधी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. पुढील वर्षी होणारी जेईई मेन परीक्षा आता आणखी काही प्रादेशिक भाषांमध्ये घेण्यात येणार आहे, अशी माहिती रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली. संयुक्त प्रवेश मंडळाने (जेएबी) नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार (एनईपी) हा निर्णय घेतला आहे. सध्या इंग्रजी, हिंदी आणि गुजराती या तीन भाषांमध्येच इंजिनिअरिंगसाठीची जेईई मेन परीक्षा (प्रवेश परीक्षा)  घेतली जाते.

"राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा हा निर्णय सरकारने आणलेल्या नव्या शिक्षण धोरणाला पुढे घेऊन जाईल. ज्या राज्यांमध्ये इंजिनिअरींग महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी प्रादेशिक भाषांना प्राधान्य दिले जाते तिथे जेईई परीक्षा प्रादेशिक भाषेत घेण्यात येईल" असं ट्विट केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना जेईई मेन परीक्षेत आणखी जास्त गुण मिळवण्यास मदत होईल. प्रादेशिक भाषांमध्ये जेईई परीक्षा घेतल्याने मेरिटमध्ये वाढ होईल. तसेच भाषेच्या अडचणीमुळे जे विद्यार्थी चांगले गुण मिळवू शकत नव्हते ते आणखी चांगले गुण मिळवण्यात सक्षम होतील असं देखील म्हटलं आहे. 

पोखरियाल यांनी "या निर्णयाचे दूरगामी परिणाम होणार आहेत कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं निदर्शनास आणून दिले आहे की, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी मूल्यांकनसाठीच्या (पीआयएसए) परीक्षेत उच्च स्थान मिळवणारे देश मातृभाषेला शिक्षणाचे माध्यम म्हणून वापरतात. संयुक्त प्रवेश मंडळाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना प्रश्न अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास आणि चांगले गुण मिळविण्यात मदत होईल" असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: nta jee main exam to be conducted in more regional languages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.