आता एकदा तरी तुम्हाला ‘अप्पा’ म्हणू का...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 04:36 AM2018-08-09T04:36:18+5:302018-08-09T04:37:15+5:30

मी आजवर तुम्हाला ‘नेताजी असे म्हणत आलो, पण आता एकदा तरी तुम्हाला अप्पा (वडील) म्हणू का? अशी भावना एम. करुणानिधी यांच्याप्रति त्यांचे पुत्र व द्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष एम. स्टॅलिन यांनी एका स्वलिखित कवितेद्वारे व्यक्त केली आहे.

Now once you call 'Appa' ... | आता एकदा तरी तुम्हाला ‘अप्पा’ म्हणू का...

आता एकदा तरी तुम्हाला ‘अप्पा’ म्हणू का...

Next

चेन्नई : मी आजवर तुम्हाला ‘नेताजी असे म्हणत आलो, पण आता एकदा तरी तुम्हाला अप्पा (वडील) म्हणू का? अशी भावना एम. करुणानिधी यांच्याप्रति त्यांचे पुत्र व द्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष एम. स्टॅलिन यांनी एका स्वलिखित कवितेद्वारे व्यक्त केली आहे. या वेळी तुम्ही काहीही न कळविताच दूरच्या प्रवासाला निघून गेलात, असे करुणानिधींच्या निधनानंतर लिहिलेल्या कवितेत स्टॅलिन यांनी म्हटले आहे. अत्यंत शोकाकुल वातावरणात करुणानिधी यांच्यावर मरीना बीच येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
चेंगराचेंगरीत दोन ठार
तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्या अंतिम दर्शनासाठी येथील राजाजी हॉल परिसरात बुधवारी जनसागर लोटला होता. त्या वेळी तिथे झालेल्या चेंगराचेंगरीत दोन जण ठार व तीस जण जखमी झाले आहेत. ही घटना सकाळी सव्वाअकरा वाजता घडली. करुणानिधी यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी जमलेल्या लोकांना गटागटाने राजाजी हॉलमध्ये सोडले जात होते. त्यात पक्ष कार्यकर्ते, सामान्य नागरिकांचा समावेश होता. प्रचंड गर्दीमुळे लोकांवर नियंत्रण ठेवणे कठीण होते. लोकांना आवरण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला. मात्र, गर्दी वाढतच गेल्याने चेंगराचेंगरी दुर्घटना घडली.
संसदेचे कामकाज
दिवसभरासाठी तहकूब
करुणानिधी यांना श्रद्धांजली म्हणून संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज बुधवारी दिवसभर तहकूब करण्यात आले. दोन्ही सभागृहाचे विद्यमान किंवा माजी सदस्य नसलेल्या व्यक्तीच्या निधनानंतर संसदेचे कामकाज तहकूब होण्याचा प्रसंग विरळा आहे. राज्यसभेचे सभापती व उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू व अन्य सदस्यांनी बुधवारी कामकाजाला प्रारंभ झाल्यावर करुणानिधींना श्रद्धांजली वाहणारी भाषणे केली. नंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले गेले.
>जन्मगावावर पसरली शोककळा
करुणानिधी यांच्या निधनाने तमिळनाडूतील त्यांच्या नागपट्टीनाम जिल्ह्यातील तिरुक्कुवलई या जन्मगावावरही शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाची बातमी कळल्यानंतर गाव व परिसरातील असंख्य लोकांची पावले श्रद्धांजली वाहण्यासाठी करुणानिधींच्या पिढीजात घराकडे वळली. तिरुक्कुवलई गावात ३ जून १९२४ रोजी करुणानिधींचा जन्म झाला होता व येथील शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षणही झाले. गावाच्या मध्यभागी हे निवासस्थान असून, आता तिथे करुणानिधींची आईच्या पुतळा उभारण्यात आला आहे, तसेच तिथे दोन ग्रंथालये सुरु करण्यात आली आहेत. या निवासस्थानी करुणानिधींचा आयुष्यपट उलगडून दाखविणारी अनेक छायाचित्रेही लावण्यात आली आहेत.
>गोरगरिबांच्या रुग्णालयासाठी स्वत:च्या निवासस्थानाचे दान
गोरगरिबांसाठी रुग्णालय उभारण्याकरिता करुणानिधी यांनी चेन्नईतील गोपालपुरमच्या आलिशान वस्तीतील आपले निवासस्थान २०१० साली दान केले होते. अलगिरी, स्टॅलिन, तामिलारासू या त्यांच्या तीन मुलांच्या नावे त्यांनी हे निवासस्थान केले होते. या तिघांची संमती घेऊन करुणानिधी यांनी त्यांच्या आईच्या नावे स्थापन केलेल्या अन्नाई अंजुगम ट्रस्टच्या ताब्यात हे निवासस्थान दिले. तिथेच ते १९५५पासून पुढची ५० वर्षे वास्तव्यास होते. आता तिथे उभारल्या जाणाऱ्या रुग्णालयाला कलाईग्नर करुणानिधी रुग्णालय हे नाव दिले जाईल.
>दिल्लीतून पडद्यामागून सूत्रे हलविणाºयांना दणका : काँग्रेस
मरिना बीचवर करुणानिधी यांचा दफनविधी करण्यास मद्रास उच्च न्यायालयाने परवानगी दिल्याबद्दल काँग्रेसने समाधान व्यक्त केले. ही जागा नाकारण्याचा कट आखण्यासाठी ज्यांनी दिल्लीहून पडद्यामागून सूत्रे हलविली, त्यांनाही न्यायालयाच्या आदेशामुळे दणका बसला आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे. मरिना बीचवर करुणानिधी यांचे स्मारक व्हावे, या मागणीला राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला होता, याकडेही सूरजेवाला यांनी लक्ष वेधले आहे.
>श्रीलंकेच्या नेत्यांनी व्यक्त केला शोक
करुणानिधी यांच्या निधनाबद्दल श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रिपल सिरिसेना, पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे, माजी अध्यक्ष महिंदा राजपक्षे आदी नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. तमिळ साहित्य, चित्रपट, राजकारणात करुणानिधींनी अनन्यसाधारण कामगिरी बजावली, असे राजपक्षे यांनी आदरांजली वाहताना म्हटले आहे.
>मोदी, राहुल गांधींनी घेतले करुणानिधींचे अंतिम दर्शन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी चेन्नईतील राजाजी हॉल येथे जाऊन करुणानिधी यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले, तसेच त्यांच्या कुटुंबीयांचेही सांत्वन केले. जनतेच्या कल्याणासाठी व सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी करुणानिधी आयुष्यभर झटले अशा शद्बांत मोदी यांनी करुणानिधींना श्रद्घांजली अर्पण केली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, तसेच या पक्षाचे नेते गुलाम नबी आझाद, वीरप्पा मोईली आदींनीही राजाजी हॉल येथे जाऊन करुणानिधींचे अंतिम दर्शन घेतले. तमिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी व या पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रकाश करात, भाकपचे ज्येष्ठ नेते डी. राजा, केरळ व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अनुक्रमे ओमन चंंडी, अखिलेश यादव, ओ. पनीरसेल्वम आदी नेत्यांनीही राजाजी हॉल येथे जाऊन करुणानिधी यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, अभिनेता रजनीकांत यांनीही करुणानिधींच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांना आदरांजली अर्पण केली.

Web Title: Now once you call 'Appa' ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.