अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 21:52 IST2025-12-02T21:50:46+5:302025-12-02T21:52:50+5:30
Ayodhya Ram Mandir: राम मंदिराचे काम पूर्ण झाल्यानंतर आता योगी आदित्यनाथ सरकारने भव्य राम मंदिर संग्रहालय बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिराचे काम पूर्ण झाले. २५ नोव्हेंबर २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचेयोगी आदित्यनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत अयोध्येतील राम मंदिरावर धर्मध्वज स्थापन करण्यात आला. राम मंदिर परिसरात अनेक देवतांची मंदिरे बांधण्यात आली आहेत. तसेच राम मंदिरातील पहिल्या मजल्यावर राम दरबार साकारण्यात आला आहे. यानंतर आता अयोध्येत भव्य राम मंदिर संग्रहालय होणार असून, याचे बांधकाम टाटांची कंपनी करणार आहे. यासाठी योगी आदित्यनाथ सरकारने ५२ एक जमीन दिल्याची माहिती देण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशातील योगी सरकारने अयोध्येत भव्य राम मंदिर संग्रहालय बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. मंदिर संग्रहालय एकूण ५२ एकर जमिनीवर बांधले जाईल. याचे बांधकामाचे काम टाटा अँड सन्स करणार आहे. अयोध्येतील एका परिसरात ५२ एकर जमिनीवर राम मंदिर संग्रहालय बांधले जाणार आहे. हे संग्रहालय केवळ भव्य नसेल तर गुणवत्ता आणि बांधकामात आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन केले जाणार आहे.
भविष्यात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील
राज्य सरकार अयोध्येत सातत्याने अनेक प्रकल्प राबवत आहे. यामुळे येणाऱ्या काळात राज्यातील लोकांना फायदा होणार आहे. शहरात येणाऱ्या पर्यटकांना अनेक सुविधा मिळू शकणार आहे. या सरकारी उपक्रमामुळे अयोध्येचा विकास तर होण्यासोबतच रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.
भविष्यातील पिढ्यांना लक्षात घेऊन विशेष डिझाइन
अयोध्येत बांधले जाणारे राम मंदिर संग्रहालय भविष्यातील पिढ्यांना लक्षात घेऊन विशेष डिझाइन केले जाईल. हे संग्रहालय जनतेला परंपरा समजून घेण्यासाठी सुलभ ठरेल. संग्रहालयात वेद, पुराणे आणि प्राचीन भारतीय साहित्याचे महत्त्व यासह विविध विषयांवर तपशीलवार माहिती प्रदान केली जाणार आहे. भारताच्या समृद्ध मंदिर वास्तुकला आणि सांस्कृतिक वारशाची माहिती दिली जाणार आहे.