ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार; बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द करा- पृथ्वीराज चव्हाण

By मुकेश चव्हाण | Published: December 21, 2020 03:46 PM2020-12-21T15:46:23+5:302020-12-21T15:47:12+5:30

काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी बोरिस जॉन्सन यांचा दौरा रद्द करण्याची मागणी केली आहे. 

A new type of corona in Britain; Cancel Boris Johnson's India tour said congress leader Prithviraj Chavan | ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार; बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द करा- पृथ्वीराज चव्हाण

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार; बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द करा- पृथ्वीराज चव्हाण

googlenewsNext

नवी दिल्ली:  ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे पुढील वर्षी २६ जानेवारी रोजी भारताच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. गेल्या 27 वर्षात पाहुणे म्हणून राजपथला भेट देणारे बोरिस जॉन्सन पहिले ब्रिटिश पंतप्रधान आहेत. यापूर्वी 1993 मध्ये ब्रिटनचे प्रमुख जॉन मेजर 26 जानेवारी रोजी मुख्य अतिथी म्हणून परेडमध्ये सामील झाले होते. मात्र ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा प्रकार समोर आला असून तो नियंत्रणाबाहेर असल्याचा इशारा तिथल्या सरकारने दिला आहे. याचपार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी बोरिस जॉन्सन यांचा दौरा रद्द करण्याची मागणी केली आहे. 

पृथ्वीराज चव्हाण एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हणाले की, ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा प्रकार समोर आल्यानंतर युरोपियन युनियनच्या अनेक राष्ट्रांनी तिथून येणाऱ्या उड्डाणांवर आणि सर्व विमान प्रवासावर बंदी घातली आहे. शिवाय रविवारपासूनच ब्रिटनमध्ये सक्तीचं लॉकडाऊनही लागू करण्यात आलं आहे. त्यामुळे जोपर्यंत नव्या विषाणूचं स्वरुप आपल्या लक्षात येत नाही तोपर्यंत इंग्लंडमधून येणारी हवाई वाहतूक आपणही तातडीने स्थगित केली पाहिजे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. 

भारताच्या यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे हे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन आहेत. परंतु ब्रिटनमध्येच कोरोनाचा नवा प्रकार समोर आल्यानंतर बोरिस जॉनसन यांचा दौरा रद्द करावा, असं चव्हाणांनी सुचवलं आहे. ते म्हणाले की, प्रजासत्ताक दिनाच्या जवळपास या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढला तर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा दौरा रद्द केला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं जनतेचं आरोग्य आहे, त्याच्याशी तडजोड नको, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. 

दरम्यान, गेल्या 27 वर्षात पाहुणे म्हणून राजपथला भेट देणारे बोरिस जॉन्सन पहिले ब्रिटिश पंतप्रधान आहेत. यापूर्वी 1993 मध्ये ब्रिटनचे प्रमुख जॉन मेजर 26 जानेवारी रोजी मुख्य अतिथी म्हणून परेडमध्ये सामील झाले होते. रिपोर्टनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 27 नोव्हेंबरला फोनवरून बोरिस जॉन्सन यांना औपचारिकरित्या आमंत्रित केले होते. यानंतर कथितरित्या पंतप्रधानांना जी -7 शिखर परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आले होते, ज्याचे आयोजन पुढील वर्षी ब्रिटेनमध्ये होणार आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानांचा हा प्रस्तावित दौरा ब्रक्झिटच्या पार्श्वभूमीवर असे मानले जात आहे की, ब्रिटन भारतासारख्या आघाडीच्या अर्थव्यवस्थांशी व्यापार संबंध दृढ करण्याचा प्रयत्न करीत आहे. व्यापार कराराशिवाय युरोपियन संघातून बाहेर पडल्यास ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मोठे नुकसान होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Web Title: A new type of corona in Britain; Cancel Boris Johnson's India tour said congress leader Prithviraj Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.