तामिळनाडूत नवा राजकुमार एम.के. स्टॅलिन!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 01:57 AM2021-05-03T01:57:40+5:302021-05-03T01:58:14+5:30

तामिळनाडूच्या राजकारणातील दोन प्रमुख नेते आणि माजी मुख्य मंत्री एम. करुणानिधी आणि जयललिता यांच्या निधनानंतर झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत एम.के. स्टॅलीन यांनी बहुमत मिळवत द्रमुकचे प्रमुख आपणच असल्याचे सिद्ध करून दाखवले.

The new prince M.K. Stalin in tamilnadu | तामिळनाडूत नवा राजकुमार एम.के. स्टॅलिन!

तामिळनाडूत नवा राजकुमार एम.के. स्टॅलिन!

Next

वसंत भोसले 
चौपन्न वर्षांनंतरदेखील तामिळनाडूचे राजकारण द्रविडियन चळवळीतून उभ्या राहिलेल्या राजकीय ताकदीचा पुन्हा एकदा विजय झाला आहे आणि त्याचा नवा राजकुमार द्रविड मुनेत्र कळघम पक्षाचे सर्वेसर्वा एम.के. स्टॅलीन असणार आहेत, हे रविवारी जाहीर झालेल्या विधानसभेच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे.

तामिळनाडूच्या राजकारणातील दोन प्रमुख नेते आणि माजी मुख्य मंत्री एम. करुणानिधी आणि जयललिता यांच्या निधनानंतर झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत एम.के. स्टॅलीन यांनी बहुमत मिळवत द्रमुकचे प्रमुख आपणच असल्याचे सिद्ध करून दाखवले. सलग दोन वेळा सत्तेत असलेल्या अण्ण्णाद्रमुक सरकारविरोधात जनतेत तीव्र नाराजी होती, तसेच माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर पक्षात मुख्यमंत्री पलानीस्वामी आणि माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम, असे दोन गट झाले होते. त्याचा परिणाम सरकारच्या निर्णय क्षमतेवर झाला होता. २०१७ मध्ये अपघाताने मुख्यमंत्री झालेल्या पलानीस्वामी यांचे सरकार काही दिवसांत कोसळेल, असे अनेकांचे मत होते; पण पलानीस्वामी यांनी केंद्र सरकारच्या मदतीने आपला कार्यकाळ पूर्ण केला.

पलानीस्वामी यांचे सरकार केंद्रातील मोदी सरकारच्या हातातील कटपुतळी असून, मोदी सरकार तामिळविरोधी आहे, ही जनभावना तयार करण्यात द्रमुकला यश आले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ३९ पैकी ३८ जागा जिंकत द्रमुकने घोडदौड सुरू केली होती. लोकसभेच्या निकालापासून स्टॅलीन यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली होती. २०१६ मध्ये अवघ्या काही जागांमुळे सत्ता गमावावी लागल्याने यावेळी कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवायचीच, असा चंग त्यांनी बांधला होता. २०१६ च्या निवडणूक निकालावर करुणानिधी यांची छाप होती. त्यांच्या बळावर मिळालेली सत्ता नको म्हणून स्टॅलीन यांनी तामिळनाडूमध्ये मध्यंतरी सत्ता स्थापन करण्याची संधी असतानाही  पलानीस्वामी सरकारला कोणताही धक्का लावला नाही. स्वकर्तृत्वावर सत्ता मिळवत अंतर्गत व बाहेरील विरोधकांना आपली शक्ती दाखविण्यासाठी त्यांनी पाच वर्षे प्रतीक्षा केली. करुणानिधींच्या निधनानंतर कौटुंबिक वादांवर मात करत द्रमुकची सूत्रे आपल्या हातात घेतली.

जनतेचा विश्वास कमावला
अण्णाद्रमुककडे जयललिता यांच्यानंतर जननेता नव्हता. पलानीस्वामी आणि पनीरसेल्वम यांचे नेतृत्व मयादित होते, तर स्टॅलीन राज्यव्यापी नेते होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदीविरोधाची भूमिका पकडत ते पुढील दोन वर्षे त्यावर काम करत राहिले. जलिकट्टू, नीट परीक्षा, तामिळ अस्मितेचा मुद्दा उचलत केंद्रविरोधात तामिळ जनता, असा संघर्ष त्यांनी तीव्र केला होता. द्रविडी राजकारणावर राष्ट्रीय पक्षाचे राजकारण थोपले जात असल्याचे त्यांनी तामिळ मतदारांना पटवून दिले. त्याचा परिणाम निकालातून दिसून येत आहे.

स्वबळावर मुुख्यमंत्रिपद मिळवणार
निवडणुकीआधीपासून केलेली तयारी, घटक पक्षांना काही जागा देत टाळलेली मतविभागणी आणि प्रचाराची सर्व सूत्रे आपल्या हातात ठेवण्याचा फायदा स्टॅलीन यांना झाला. त्याचप्रमाणे नोटाबंदीनंतर राज्यातील उद्योगधंद्यांची झालेली दुरवस्था, अण्णाद्रमुकने भाजपसोबत केलेली आघाडी, कोरोना काळात मोदी सरकारची कामगिरी याचा परिणाम निवडणूक निकालावर दिसून येतो. करुणानिधी असताना स्टॅलीनना नेहमी त्यांच्या छायेत वावरावे लागत होते; पण त्यातून बाहेर पडत स्वबळावर सत्तेत येण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. 

Web Title: The new prince M.K. Stalin in tamilnadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.