The nation's capital delhi in flood crisis; 8.7 lakh cusecs of water left from Haryana to Yamuna | देशाची राजधानी संकटात; हरियाणातून यमुनेत सोडले तब्बल 8.7 लाख क्युसेक पुराचे पाणी

देशाची राजधानी संकटात; हरियाणातून यमुनेत सोडले तब्बल 8.7 लाख क्युसेक पुराचे पाणी

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या 70 वर्षातील सर्वात मोठा महापूर आणि उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये ढगफुटीमुळे नद्या नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. दोन्ही राज्यांमध्ये पाऊस आणि पुरामुळे 31 जणांचा मृत्यू झाला असून अनेक लोक बेपत्ता आहेत. या राज्यांतील पाणी आता दिल्लीलाही वेढण्याची शक्यता असून यमुना नदीतून गेल्या 40 वर्षांतील सर्वाधिक पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे देशाची राजधानी पुराच्या पाण्यात जाण्याची स्थिती निर्मान झाली आहे. 


गेल्या 15 दिवसांपासून महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात या राज्यांना पुराचा फटका सहन करावा लागला आहे. यातच केरळ, आसाममध्येही महापुराची स्थिती आहे. येथील पूर ओसरतो न ओसरतो तोच उत्तरेकडील राज्यांमध्ये मुसळधार अतिवृष्टी होत आहे. यमुना नदीची पातळी वाढल्याने हरियाणाच्या हथिनीकुंड डॅममधून रविवारी तब्बल 8.72 लाख क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी सोमवारी सायंकाळपर्यंत दिल्लीला पोहोचण्याची शक्यता आहे. याआधी 1978 मध्ये पुरामुळे हरियाणातून 7 लाख क्यूसेक पाणी सोडण्यात आले होते. काल सोडलेले पाणी जवळपास 2 लाख क्युसेकनी जास्त आहे. 


एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्यामुळे यमुना नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची स्थिती असून दिल्ली सरकारने आपत्कालीन बैठक बोलावली आहे. तसेच खालील भागातील लोकांना हलविण्यात आले आहे. यामध्ये सोनिया विहार, गीता कॉलनी, मयूर विहार, डीएनडी, यमुना बाजार, काश्मीरी गेट, वजीराबाद, लोहे का पूल, आयटीओ ओखला, जामिया आणि जैतपूर हे भाग सहभागी आहेत. येथील लोकांना सुरक्षित स्थळी तंबूंमध्ये आसरा देण्यात आला आहे. सध्या 1100 तंबू लावण्यात आले असून जवळपास 5 हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. 

मनाली आणि कुल्लूदरम्यान असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या काही भागाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अतिशय धीम्या गतीने सुरू आहे. शिमल्यात आरटीओ कार्यालयाजवळ भूस्खलन होऊन तीन जणांचा मृत्यू झाला आहे. वातावरणत बदल होत असल्याने हवामान खात्याने हिमाचल, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. जोरदार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

Web Title: The nation's capital delhi in flood crisis; 8.7 lakh cusecs of water left from Haryana to Yamuna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.