लखनौमधील हत्याकांडाचे नागपूर कनेक्शन : एटीएसकडून एक संशयित ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 11:16 PM2019-10-19T23:16:10+5:302019-10-19T23:19:44+5:30

उत्तरप्रदेशमधील हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या लखनौमधील हत्याकांडाचे गुजरातनंतर नागपूर कनेक्शन उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर, नागपुरातील एका व्यक्तीची स्थानिक एटीएसच्या कार्यालयात रात्रीउशिरापर्यंत चौकशी सुरू होती.

Nagpur connection to the massacre in Lucknow | लखनौमधील हत्याकांडाचे नागपूर कनेक्शन : एटीएसकडून एक संशयित ताब्यात

लखनौमधील हत्याकांडाचे नागपूर कनेक्शन : एटीएसकडून एक संशयित ताब्यात

Next
ठळक मुद्देउपराजधानीत खळबळ, रात्रीपर्यंत सुरू होती चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उत्तरप्रदेशमधील हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या लखनौमधील हत्याकांडाचे गुजरातनंतर नागपूर कनेक्शन उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर, नागपुरातील एका व्यक्तीची स्थानिक एटीएसच्या कार्यालयात रात्रीउशिरापर्यंत चौकशी सुरू होती. मात्र, त्याचे नाव, पत्ता सांगण्यासाठी तपास यंत्रणेतील कोणताही अधिकारी तयार नव्हता.
तिवारी यांची दोन दिवसांपूर्वी लखनौमध्ये दिवसाढवळ्या निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडामुळे देशभरात प्रचंड खळबळ उडाली होती. तिवारींचा गळा कापून आणि गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येमुळे केवळ लखनौ, उत्तरप्रदेशच नव्हे तर देशभर खळबळ उडाली आहे. यूपी पोलीस, एटीएससह देशातील बहुतांश तपास यंत्रणा या खळबळजनक हत्याकांडाचा तपास करीत होत्या. घटनास्थळी पोलिसांना मिठाईचा एक बॉक्स सापडला होता. त्या बॉक्सवर सूरत(गुजरात)चा पत्ता होता. त्यावरून तपास यंत्रणांनी सूरतमधील त्या मिष्ठान्न भांडारातील सीसीटीव्ही फुटेज आणि लखनौमधील सीसीटीव्ही फुटेजची सांगड घालत तिवारीच्या मारेकऱ्यांची ओळख पटवली होती. या पार्श्वभूमीवर, त्यांचे कॉल डिटेल्स तपासले असता मारेकऱ्यांनी या हत्याकांडानंतर एक फोन नागपुरातही केल्याचे उघड झाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्या पार्श्वभूमीवर, एटीएसच्या स्थानिक पथकाने जाफरनगरातील एका संशयिताला ताब्यात घेतले. यासंबंधाने एटीएसने कमालीची गोपनीयता बाळगली आहे. त्यांनी इतरांना सोडा खुद्द शहर पोलीस आयुक्तांनाही सविस्तर माहिती देण्याचे टाळल्याचे समजते. मात्र खास सूत्रांच्या माहितीनुसार, कमलेश तिवारींच्या हत्येचे आरोपी मईनुद्दीन शेख आणि अशफाक शेखशी नागपुरातील संशयित संबंधित आहे. वृत्त लिहिस्तोवर त्याची चौकशी सुरू होती. विशेष म्हणजे, हत्येचा सूत्रधार रशीद पठाण, मौलाना मोहसिन शेख आणि फैजानला यापूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतले असून, मईनुद्दीन शेख तसेच अशफाक शेख या दोघांचा शोध घेतला जात आहे. या दोघांनी सूरतमधून चाकू आणि मिठाई खरेदी केली होती. तेथून त्यांनी लखनौ गाठले आणि घरी जाऊन तिवारींची हत्या केल्याचे सांगितले जाते.
इसिसचे कनेक्शन?
या खळबळजनक हत्याकांडात इसिसचे कनेक्शन असल्याची चर्चा आहे. कमलेश तिवारींच्या हत्येचा कट गुजरातमध्ये रचण्यात आला आणि दुसऱ्या  दोन राज्यातले सुपारी किलर या हत्याकांडासाठी वापरण्यात आल्याचे सांगितले जाते. गृहमंत्रालयाशी अत्यंत निकटचे संबंध असलेल्या उत्तरप्रदेशातील एका तरुण अधिकाऱ्या च्या देखरेखीत हा तपास सुरू आहे. नागपुरात एका संशयिताला ताब्यात घेतल्याचे कळताच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि उत्सुकतेपोटी अनेकांनी एटीएस कार्यालयासमोर रात्री मोठी गर्दी केली होती.

Web Title: Nagpur connection to the massacre in Lucknow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.