माऊलींच्या मुख्य मंदिरास धोका !

By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:19+5:302014-12-12T23:49:19+5:30

दर्शनबारीचे चुकीचे काम : पहाणीनंतर तज्ज्ञांनी दिली मंजुरी

Mouli's main temple at risk! | माऊलींच्या मुख्य मंदिरास धोका !

माऊलींच्या मुख्य मंदिरास धोका !

्शनबारीचे चुकीचे काम : पहाणीनंतर तज्ज्ञांनी दिली मंजुरी
भानुदास पऱ्हाड
आळंदी : संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री ज्ञानोबारायांच्या मुख्य मंदिराच्या पाठीमागील बाजूस नवीन दर्शनबारीचे काम चुकीच्या पद्धतीने होत असल्याने माऊलींच्या मुख्य मंदिरास धोका निर्माण झाला आहे. परिणामी नगरपालिकेने हे काम बंद करण्याची नोटीस बजावली. मात्र तज्ज्ञांनी या कामांची पहाणी करून हे काम २४ तासांत मार्गी लावण्याचा अहवाल नगरपरिषदेला दिला आहे. त्यामुळे दर्शनबारीचे काम रात्री उशिरा पुन्हा सुरू करण्यात आले.
दर्शनासाठी होत असलेल्या भाविकांच्या गैरसोयीचा विचार करून मंदिराशेजारी दर्शनबारीचे काम सुरू आहे. मात्र मोठ्या प्रमाणात पोकलेनने खोदकाम केल्याने मंदरिाचा मूळ पायाच बाहेर पडला. मंदिराच्या सभोवताली असलेल्या दगडी कमानीला तसेच घुमटाला भेगा पडल्या. तसेच शेजारील इमारतींना धोका निर्माण झाला आहे.
आळंदी नगरपरिषदेने तत्काळ हे काम थांबाविण्यासंदर्भातची नोटीस मंदिर देवस्थानला दिली. त्यानंतर हे काम काहीकाळ बंद करण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा ते सुरू करण्यात आले. त्यानंतर नगरपालिकेने देवस्थानला प्रमुख विश्वस्तांच्या नावे दुसऱ्यांदा काम थांबविण्याची नोटीस दिली. तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच काम करावे असे सांगितले.
सायंकाळी पाचच्या सुमारास प्राध्यापक भालचंद्र बिराजदार, प्रमुख विश्वस्त डॉ. प्रशांत सुरु, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, आर.सी.सी. कान्स्लटंट रामभाऊ चोपदार, अभियंते आदींनी दर्शनबारीच्या कामाची पाहणी करून काम पुढे सुरू ठेवण्यास सांगितले. (वार्ताहर)
-----
खोदकामादरम्यान अशा समस्या उद्भवत असतात. मात्र योग्य पद्धती वापरून काम पूर्ण होणे गरजेचे आहे. सुरू असलेले दर्शनबारीचे तळातील काम तात्काळ पूर्ण करावे.
- प्रा. भालचंद्र बिराजदार, शासकीय महाविद्यालय, पुणे
---
दर्शनबारीच्या कामामुळे भिंतीना चिरा पडल्या आहेत, हे खरे आहे. परंतु मंदिराला कुठलाही धोका निर्माण झालेला नाही. सल्लागारांचे व्यक्तिगत आणि सामुहिक विचारमंथन सुरू आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- डॉ. प्रशांत सुरु (प्रमुख विश्वस्त, आळंदी देवस्थान)

Web Title: Mouli's main temple at risk!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.