मोदी व त्यांच्या प्रवृत्तीविरुद्ध लढणाऱ्यांनाही काँग्रेस संपावी असं वाटणं हा सर्वात गंभीर धोका : शिवसेना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 08:28 AM2021-12-04T08:28:24+5:302021-12-04T08:28:57+5:30

ममता बॅनर्जींच्या भेटीनंतर विरोधकांकडून निदान शब्दांचे हवाबाण तरी सुटताहेत : शिवसेना

The most serious threat to those who are fighting against Modi and his tendencies is that the Congress should end: Shiv Sena | मोदी व त्यांच्या प्रवृत्तीविरुद्ध लढणाऱ्यांनाही काँग्रेस संपावी असं वाटणं हा सर्वात गंभीर धोका : शिवसेना

मोदी व त्यांच्या प्रवृत्तीविरुद्ध लढणाऱ्यांनाही काँग्रेस संपावी असं वाटणं हा सर्वात गंभीर धोका : शिवसेना

Next

ममता बॅनर्जी यांच्या मुंबई भेटीनंतर विरोधी पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. निदान शब्दांचे हवाबाण तरी सुटत आहेत. भारतीय जनता पक्षासमोर समर्थ पर्याय उभा करायला हवा यावर एकमत आहेच, पण कोणी कोणाला बरोबर घ्यायचे किंवा वगळायचे यावर विरोधकांत अखंड खल सुरू आहे. विरोधकांतच ऐक्याचा किमान समान कार्यक्रम तयार होणार नसेल तर भाजपास समर्थ पर्याय देण्याच्या बाता कोणी करू नयेत. आपापली राज्ये व पडक्या, मोडक्या गढय़ा सांभाळीत बसावे की एकत्र यावे यावर तरी किमान एकमत होणे गरजेचे आहे. त्या ऐक्याचे नेतृत्व कोणी करावे तो पुढचा प्रश्न, असे शिवसेनेने म्हटले आहे. 

ममतांचे राजकारण काँग्रेसधार्जिणे नाही. प. बंगालातून त्यांनी काँग्रेस, डावे व भाजपलाही संपवले हे सत्य असले तरी काँग्रेसला राष्ट्रीय राजकारणातून दूर ठेवून राजकारण करणे म्हणजे सध्याच्या ‘फॅसिस्ट’ राज्य प्रवृत्तीस बळ देण्यासारखेच आहे. काँग्रेसचा सुपडा साफ व्हावा असे मोदी व त्यांच्या भाजपास वाटणे एकवेळ समजू शकतो. तो त्यांच्या कार्यक्रमाचाच भाग आहे, पण मोदी व त्यांच्या प्रवृत्तीविरुद्ध लढणाऱ्यांनाही काँग्रेस संपावी असे वाटणे हा सगळ्यात गंभीर धोका असल्याचे म्हणत शिवसेननेने निशाणा साधला. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून यावर भाष्य केले.

काय म्हटलेय अग्रलेखात? 
काँग्रेस पक्षाची गेल्या दहा वर्षांतील घसरण चिंताजनक आहे याबाबत दुमत नाही. तरीही उताराला लागलेली ही गाडी पुन्हा वर चढूच द्यायची नाही व काँग्रेसची जागा आपण घ्यायची हे मनसुबे घातक आहेत. काँग्रेसचे दुर्दैव असे की, ज्यांनी आयुष्यभर काँग्रेसकडून सुख–चैन–सत्ता प्राप्त केली तेच लोक काँग्रेसचा गळा दाबत आहेत. गुलाम नबी आझाद यांनी 2024 च्या निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी चांगली नसेल, असा शाप दिला आहे. आजची स्थिती कायम राहिल्यास काँग्रेसची स्थिती निराशाजनक राहील, असे श्री. आझाद म्हणतात. आझाद वगैरे मंडळींनी ‘जी २३’ नामक असंतुष्टांचा गट स्थापन केला आहे व त्या गटातील जवळ जवळ प्रत्येकाने काँग्रेसकडून सत्ता-सुख भोगले. मग या गटातील तेजस्वी मंडळाने काँग्रेसची आजची स्थिती सुधारण्यासाठी काय केले? की या तेजस्वी मंडळासही आतून वाटते की, २०२४ साली काँग्रेसची कामगिरी निराशाजनक व्हावी. जे भाजपास वाटते तेच या मंडळींना वाटते हा एक अपूर्व योगायोगच म्हणावा लागेल.

तोवर ‘गेम चेंज’ होणार नाही
काँग्रेसने लोकसभेत शंभरी पार केल्याशिवाय राष्ट्रीय पातळीवरील ‘गेम चेंज’ होणार नाही. त्यामुळेच भाजपची रणनीती काँग्रेसला रोखण्याची असेलच, पण हीच रणनीती मोदी अथवा भाजपविरोधाच्या मशाली पेटवणाऱयांनी ठेवली तर कसे व्हायचे? देशात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘यूपीए’ आहेच कुठे? हा सवाल मुंबईत येऊन ममता बॅनर्जी यांनी विचारला. तो प्रश्नच सध्याच्या स्थितीत लाखमोलाचा आहे. यूपीए अस्तित्वात नाही तसा एनडीएही नाही. मोदी यांच्या पक्षाला आज एनडीएची गरज नाही, पण विरोधकांना यूपीएची गरज आहे. यूपीए समांतर दुसरी आघाडी स्थापन करणे हे भाजपचे हात बळकट करण्यासारखेच आहे. 

चर्चेतच वेळ
‘यूपीए’ नसेल तर दुसरे काय? या चर्चेतच वेळ घालवला जात आहे. ज्यांना विरोधकांची भक्कम आघाडी हवी आहे, त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन ‘यूपीए’च्या मजबुतीसाठी प्रयत्न करायला हवेत. एनडीए किंवा यूपीए या आघाडय़ा अनेक पक्षांच्या एकत्र येण्याने उभ्या राहिल्या. ज्यांना दिल्लीतील सध्याची राजकीय व्यवस्था खरोखर नको आहे, त्यांनी ‘यूपीए’चे मजबुतीकरण हेच लक्ष्य ठेवले पाहिजे. काँग्रेसशी ज्यांचे मतभेद आहेत ते ठेवूनही ‘यूपीए’ची गाडी पुढे ढकलता येईल. अनेक राज्यांत आजही काँग्रेस आहे. गोवा, ईशान्येकडील राज्यांत तृणमूलने काँग्रेस फोडली. पण त्यामुळे तृणमूलचे बळ दोन-चार खासदारांनी वाढले इतकेच. 

पर्याय उभा करा
राजकारणातील घरे, खानदाने, बालेकिल्लेही बघता बघता कोसळून जातात. २०२४ साली कुणाचे दैव, कोणाचे भाग्य फळफळेल ते सांगता येत नाही. १९७८ सालात जनता पक्षाच्या क्रांतिकारक विजयानंतर इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर कधीच येणार नाहीत असा जोश लोकांत होता. भाजपचा जन्म कायम विरोधी बाकांवरच बसण्यासाठी झाला आहे, अशी टवाळकी पचवून हा पक्ष अवकाशात झेपावला आहे. आज राहुल गांधी, प्रियंका गांधींची राजकीय कुचाळकी सुरूच आहे. राहुल गांधी व प्रियंका अशा कुचाळक्यांना तोंड देत संघर्ष करीत आहेत. प्रियंका लखीमपूर खिरीत पोहोचल्या नसत्या तर शेतकऱयांच्या खुनाचे प्रकरण रफादफाच झाले असते. हेच विरोधकांचे काम आहे. ‘यूपीए’ नेतृत्वाचा दैवी अधिकार कोणाचा ते येणारा काळ ठरवेल. आधी पर्याय तर उभा करा!

Web Title: The most serious threat to those who are fighting against Modi and his tendencies is that the Congress should end: Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.