Modi is like a hollow bamboo, whereas Rahul Gandhi is like sugarcane sweet - Navjot Singh Siddhu | मोदी पोकळ बांबूसारखे, तर राहुल गांधी उसासारखे गोड, सिद्धूंनीं केली भन्नाट तुलना 
मोदी पोकळ बांबूसारखे, तर राहुल गांधी उसासारखे गोड, सिद्धूंनीं केली भन्नाट तुलना 

कोझिकोडे - माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धू हे आपल्या राजकीय विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आताही सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींची तुलना करणारे विधान केले आहे. केरळ येथील कोझिकोडे येथे प्रचारसभेला संबोधित करताना सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोकळ बांबूप्रमाणे तर राहुल गांधी हे उसासारखे गोड आहेत, असे म्हटले आहे.  

पंजाब सरकारमध्ये मंत्री असलेले नवज्योत सिंह सिद्धू  यांनी आज केरळमधील वायनाड, कोझिकोडे आणि वाडकारा येथे काँग्रेससाठी प्रचारसभा घेतल्या. यावेळी सिद्धू यांनी नोटाबंदी, बेरोजगारी, बँकांचा वाढलेला एपीए अशा अनेक मुद्द्यांवरून भाजपा सरकार आणि नरेंद्र मोदीवर जोरदार टीका केली. 

यावेळी सिद्धू म्हणाले की,'' नरेंद्र मोदी हे केवळ ०.१ टक्के उद्योगपतींचे पंतप्रधान बनून राहिले. देशातील ९९ टक्के शेतकरी, मजूर आणि गरीब यांचे अस्तित्व त्यांच्यादृष्टीने महत्त्वाचे नसल्याचे त्यांनी सिद्ध केले. आश्वासने अंडी केवळ फोडण्यासाठी असतात, असे मोदींना वाटते. त्यांची आश्वासने बांबूसारखी असतात. ती मोठी असतात पण आतून पोकळ असतात. पण राहुल गांधी यांची आश्वासने उसासारखी आहेत जी आतून आणि बाहेरून दोन्हीकडून गोड आहेत.

सिद्धू पुढे म्हणाले की, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये ५० लाख शेतकऱ्यांना राहुल गांधी यांच्या कर्जमाफीच्या आश्वासनामुळे फायदा मिळाला आहे. काँग्रेसने हे आश्वासन केवळ दोन तासांत पूर्ण केले. दरम्यान गेली पाच वर्षे ही देशाच्या इतिहासातील सर्वात वाईट काळ होता. दोन वर्षांपासून मोदी केवळ हवेत फिरत आहेत. मात्र राहुल गांधी हे जमिनीशी जोडले गेलेले नेते आहेत, असा टोला सिद्धू यांनी लगावला. 
  


Web Title: Modi is like a hollow bamboo, whereas Rahul Gandhi is like sugarcane sweet - Navjot Singh Siddhu
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.