अतिरेक्यांनी शरणागती पत्करण्यावर लष्कराचा भर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2021 02:18 AM2021-01-16T02:18:35+5:302021-01-16T02:18:58+5:30

एसओपीमध्ये बदल : सहा महिन्यांत १७ युवक वाचले

Military pressure on militants to surrender | अतिरेक्यांनी शरणागती पत्करण्यावर लष्कराचा भर

अतिरेक्यांनी शरणागती पत्करण्यावर लष्कराचा भर

Next

अंतिपुरा (जम्मू-काश्मीर) :  जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीच्या वेळी अतिरेक्यांनी शरणागती पत्करावी, यावर लष्कर सध्या भर देत आहे. यासाठी भारतीय लष्कराने दहशतवादविरोधी मोहिमेतील मानक संचालन प्रक्रियेत (एसओपी) बदल केले असून, या धोरणामुळे मागील सहा महिन्यांमध्ये १७ युवकांचे प्राण वाचविण्यात यश मिळाले आहे.

दक्षिण आणि मध्य काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी निपटणाऱ्या व्हिक्टर फोर्सअंतर्गत काम करणाऱ्या राष्ट्रीय रायफल्सच्या (आरआर) चार शाखांना लष्कर दिनानिमित्त चीफ ऑफ आर्मी स्टाफ युनिट प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आले. ५० आरआर, ४४ आरआर, ४२ आरआर व ३४ आरआरने विविध दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये सहभाग नोंदविलेला आहे व मागील वर्षी सप्टेंबरपासून सात जणांचे शरणागती पत्करण्यासाठी मन वळविले आहे. भरकटलेल्या युवकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय मागील वर्षी करण्यात आला होता. देशाच्या राजधानी लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांच्या हस्ते यासाठी सन्मानित करण्यात आले. या शाखा कुमाऊं, राजपूत, आसाम व जाट रेजिमेंटच्या जवानांना घेऊन तयार करण्यात आल्या आहेत.

याबाबत उपलब्ध करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की, गंभीर धोका न जुमानता लष्कराने अतिरेक्यांच्या कुटुंबीयांना चकमकीच्या ठिकाणी आणून त्यांना शस्त्रे टाकण्यास राजी केले. अशाच प्रकारच्या एका व्हिडिओमध्ये जाहिद नामक अतिरेकी त्याच्या वडिलांशी भावपूर्वक भेटताना दिसत आहे. माझ्या मुलाचा आज दुसरा जन्म झाला, असे त्याचे वडील म्हणतानाही दिसत आहेत. हिंसेचा मार्ग सोडण्याची संधी दिल्याबद्दल आत्मसमर्पण करणारे अतिरेकी भारतीय लष्कराचे आभार मानतानाही व्हिडिओमध्ये दिसत आहेत. चकमकीच्या वेळी शरणागती पत्करण्याबाबतच्या मोहिमेची देखरेख करणाऱ्या व्हिक्टर फोर्सचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल राशीम बाली यांनी म्हटले आहे की, या मोहिमेमुळे स्थानिक लोकांत मोठ्या प्रमाणावर सद्भावना निर्माण झाली आहे. मुख्य प्रवाहात परतण्यासाठी अद्यापही दारे खुली आहेत, याचा विश्वास यामुळे वाढीस लागला आहे. मुख्य प्रवाहात परंतु इच्छिणाऱ्यांना मदत करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. त्यासाठी आमचे प्राण धोक्यात गेले तरी चालतील. मात्र, याचबरोबर बंदुका हाती घेऊन दहशतवाद पसरवू इच्छिणाऱ्यांविरुद्ध मोहीम सुरूच राहणार आहे.

कुठून आली ही कल्पना?
चकमकीच्या वेळीच अतिरेक्यांचे मन वळवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची कल्पना मागील वर्षी पुढे आली. अतिरेकी समूह अल बद्रचा अतिरेकी शोएब अहमद भट याने चकमक सुरू असताना शस्त्रे टाकण्याची इच्छा व्यक्त केली होती. तो दक्षिण काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यातील प्रादेशिक सेनेच्या एका जवानाची हत्या करणाऱ्या समूहाचा एक भाग होता परंतु लष्कराने त्याच्या शरणागतीचा मार्ग मोकळा केला व त्याला चौकशीनंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. तेथून ही कल्पना पुढे आली व तिचा विस्तार करण्यात आला.

Web Title: Military pressure on militants to surrender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.