'...तेव्हा पर्रीकरांनी माझ्यासह गडकरींनाही धक्का दिला'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 12:18 PM2019-05-18T12:18:48+5:302019-05-18T12:24:08+5:30

ज्येष्ठ आमदारानं सांगितली पर्रीकरांची आठवण

manohar parrikar shocks me over road development project work with nitin gadkari says sudin dhavalikar | '...तेव्हा पर्रीकरांनी माझ्यासह गडकरींनाही धक्का दिला'

'...तेव्हा पर्रीकरांनी माझ्यासह गडकरींनाही धक्का दिला'

Next

पणजी : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बहुतेकवेळा माझ्याच बैठका झाल्या. कारण मी गोव्याचा सार्वजनिक बांधकाम मंत्री होतो. बहुतेक बैठकांना पर्रीकर येतदेखील नव्हते. त्यांनी पहिल्याच बैठकीत माझ्यासह गडकरींनाही आश्चर्याचा धक्का दिला, असे माजी बांधकाम मंत्री व मगो पक्षाचे विद्यमान ज्येष्ठ आमदार सुदिन ढवळीकर यांनी शनिवारी 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीवेळी सांगितले.

गडकरी दोन दिवसांपूर्वी गोव्यात पणजीच्या पोटनिवडणूक प्रचाराला आले होते. त्यावेळी गडकरी यांनी पणजीत जाहीर सभेवेळी काही विधाने केली. ढवळीकर हे एरव्ही कधीच गडकरी यांना प्रत्युत्तर देत नव्हते. पण गडकरी यांच्या विधानांच्या अनुषंगाने ढवळीकर प्रथमच बोलले. आपल्याला व गडकरी यांना पर्रीकर यांनी बैठकीत कसे आश्चर्यचकित केले ते आपण सांगतो, म्हणजे उर्वरित विषयाची कल्पना अनेकांना येईल, असे ढवळीकर म्हणाले. गोव्यात 2012 साली भाजपाप्रणीत आघाडीचे सरकार आले. त्या सरकारमध्ये मी बांधकाम मंत्री झालो. मी त्यावेळी केंद्रातील यूपीए सरकारकडे गोव्यातील साधनसुविधांसाठी शेकडो कोटी रुपयांचे प्रस्ताव घेऊन गेलो होतो. पण त्या प्रस्तावांवर काँग्रेसप्रणीत आघाडी सरकारने मोठे निर्णय घेतले नाहीत. फक्त दोन प्रकल्पांची निविदा प्रक्रिया सुरू केली होती, असे ढवळीकर यांनी सांगितले.

'2014 साली केंद्रात मोदी सरकार आले आणि गडकरी भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग बांधकाम मंत्री झाले. मला पर्रीकर यांनी गडकरी यांच्याकडे पाठवले. मी गडकरींकडे गेलो व जुन्या प्रस्तावांचा पाठपुरावा केला. गडकरी मदतीसाठी तयार झाले. त्यानंतर मी, गडकरी व पर्रीकर अशी एकत्र आणि महत्त्वाची बैठक झाली. त्या बैठकीवेळी पर्रीकर यांनी गोव्यातील सर्व राष्ट्रीय महामार्गावरील कामे गोवा सरकार करेल', असे गडकरी यांना सांगितले. महामार्गाचे रुंदीकरण, चौपदरीकरण, सहा पदरीकरण, महामार्गावर पूल बांधणे, उड्डाण पूल व बायपास बांधणे ही सगळी कामे गोवा सरकार स्वत:च्या तिजोरीतून करेल, असे पर्रीकर यांनी गडकरी यांना सांगून आश्चर्याचा धक्का दिला'. 

'अचानक पर्रीकर बैठकीत तसे बोलले व त्यांनी लगेच केंद्राने त्यासाठी ना हरकत दाखला द्यावा अशीही विनंती गडकरी यांना केली. मलाही आश्चर्य वाटले. राष्ट्रीय महामार्ग हे केंद्राच्या अखत्यारित येतात अणि गोवा सरकार शेकडो कोटींचा निधी राष्ट्रीय महामार्गावर कसा म्हणून खर्च करू शकेल असा प्रश्न मला व गडकरींना पडला. शेवटी पर्रीकर यांच्या आग्रहामुळे गडकरींनी चोवीस तासांत ना हरकत दाखला दिला. मात्र काही महिन्यांनी पर्रीकर यांनी मला गडकरींकडे चला व गोव्यातील राष्ट्रीय महामार्गावरील सगळी कामे करून घेण्यासाठी केंद्राने निधी द्यावा अशी विनंती गडकरींना करा असे सांगितले. मी पुन्हा गडकरींकडे गेलो व उलटी प्रक्रिया सुरू करण्याची त्यांना विनंती केली. तुम्हीच निधी द्यावा अशी विनंती केली. ते हसले. मात्र मोठ्याय़ा मनाने गडकरी यांनी गोव्याला पंधरा हजार कोटींचा निधी उपलब्ध करून दिला, असे ढवळीकर यांनी सांगितले.
 

Web Title: manohar parrikar shocks me over road development project work with nitin gadkari says sudin dhavalikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.