Manmohan Singh filed his nomination for Rajya Sabha from Rajasthan | मनमोहनसिंग यांचा राज्यसभेसाठी राजस्थानातून उमेदवारी अर्ज दाखल
मनमोहनसिंग यांचा राज्यसभेसाठी राजस्थानातून उमेदवारी अर्ज दाखल

जयपूर : माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांंनी मंगळवारी राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी राजस्थानमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. राज्यातील जनतेच्या भल्यासाठी प्रयत्न करील, अशी ग्वाही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

राज्यसभेच्या राजस्थानमधील रिक्त जागोसाठी उमेदवारी दिल्याबद्दल त्यांनी काँग्रेस पक्ष, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि काँग्रेसच्या सर्व सदस्यांचे आभार मानले. राजस्थान विधानसभेतील निर्वाचन अधिकाऱ्यांच्या कक्षात त्यांनी उमेदवारी अर्जाचे चार संच दाखल केले. भाजपचे नेते मदनलाल  सैनी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांच्या कुुटुबियांप्रती मनमोहनसिंग यांनी सहवेदना व्यक्त केल्या. जूनमध्ये सैनी यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली होती.

उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासमवेत मुख्यमंत्री गेहलोत, उपमुख्यमंत्री पायलट, अ.भा. काँग्रेसचे सरचिटणीस व राज्याचे प्रभारी अविनाश पांडे, विधिमंडळ कामकाजमंत्री शांती धारीवाल, मुख्य प्रतोद महेश जोशी, आरोग्यमंत्री रघू शर्मा आदी उपस्थित होते. मनमोहनसिंग यांच्या अनुभवाचा काँग्रेसला फायदा होईल. राजस्थानमधील रिक्त जागेसाठी काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली, याचा आनंद वाटतो. मनमोहनसिंग यांना खासदार करण्याची राजस्थानमधील काँग्रेसच्या आमदारांना, काँग्रेसजनांना संधी मिळणार असल्याचा मला आनंद वाटतो, असे सचिन पायलट म्हणाले.


मनमोहनसिंग हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून, १९९१ ते २०१९ पर्यंत सलग पाच वेळा ते राज्यसभेचे सदस्य होते, तर २००४ ते २०१४ यादरम्यान सलग दोनदा देशाचे पंतप्रधान होते. यावर्षी १४ जून रोजी त्यांची राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपली होती.


Web Title: Manmohan Singh filed his nomination for Rajya Sabha from Rajasthan
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.