Maharashtra Election, Maharashtra Government: The process to form government has started - Sanjay Raut | महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या पुढील घ़डामोडी मुंबईतून होतील, संजय राऊत यांचे सूचक संकेत
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या पुढील घ़डामोडी मुंबईतून होतील, संजय राऊत यांचे सूचक संकेत

नवी दिल्ली - महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याबाबत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये जवळपास एकमत झाले आहे. दरम्यान, राज्यातील सत्तास्थापनेबाबत दिल्लीतील चर्चा जवळपास पूर्ण होत आली आहे, आता  पुढील घडामोडी  मुंबईतून होतील. सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला अंतिम रूप देण्यासाठी तिन्ही पक्षांची बैठक मुंबईत होणार असून, पुढच्या दोन दिवसांत अंतिम निर्णय जाहीर होईल, अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली.

राज्यातील सरकार स्थापनेच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यात ते म्हणाले की, ‘’सरकार स्थापन करण्या्संदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी काही निर्णय घेतले आहेत. त्यांचे माझ्याशी बोलणे झाले आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीसुद्धा फोनवरून चर्चा झाली आहे. काल झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठकीत किमान समान समान कार्यक्रमावर चर्चा झाली. आता पुढच्या दोन दिवसांत अंतिम निर्णय होणार आहे. तसेच सरकार स्थापनेची प्रक्रिया १ डिसेंबरपूर्वी पूर्ण होईल.’’

‘’राज्यातील सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मी आज पुन्हा एकदा शरद पवार यांना भेटणार आहे. तसेच सत्तावाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा करण्यासाठी तिन्ही पक्षांची बैठक मुंबईत होणार आहे. त्यात सत्तावाटपाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल. तसेच सध्यातरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या वाटपाबाबत चर्चा झालेली नाही. त्यामुळे न झालेल्या चर्चांवर मी बोलणार नाही. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा, अशी आमची इच्छा आहे.’’असे संजय राऊत यांनी सांगितले.

तसेच राज्यात सत्तास्थापनेबाबत सध्या दिल्लीत सुरू झालेल्या चर्चा आता अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. आता सत्तास्थापनेबाबतचे यापुढील निर्णय हे मुंबईतून होतील. तसेच सरकार कधी स्थापन होईल आणि कोण मुख्यमंत्री होईल, याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच कळेल, असे सूचक वक्तव्यही राऊत यांनी या वेळी केले.

Web Title: Maharashtra Election, Maharashtra Government: The process to form government has started - Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.