Maharashtra Government: दोन दिवसांत 'कॉमन मिनिमम प्रॉग्राम'वर शिक्कामोर्तब?; सत्तास्थापनेसाठी दिल्लीत खलबतं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 03:23 PM2019-11-19T15:23:45+5:302019-11-19T15:27:31+5:30

Maharashtra News : त्यानंतर पुढील बोलणीसाठी शिवसेनेशी चर्चा करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Maharashtra Election, Maharashtra Government: Give final shape to the Common Minimum Program of NCP-Congress in 2 days | Maharashtra Government: दोन दिवसांत 'कॉमन मिनिमम प्रॉग्राम'वर शिक्कामोर्तब?; सत्तास्थापनेसाठी दिल्लीत खलबतं

Maharashtra Government: दोन दिवसांत 'कॉमन मिनिमम प्रॉग्राम'वर शिक्कामोर्तब?; सत्तास्थापनेसाठी दिल्लीत खलबतं

googlenewsNext

नवी दिल्ली - राज्यातील सत्तास्थापनेवर दिल्लीत मोठ्या हालचाली सुरु आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीचे मोठे नेते दिल्ली मुक्कामी आहेत. सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात सोमवारी बैठक झाली. त्या बैठकीत पवारांनी सांगितल्यानुसार शिवसेनेचा तसेच सत्तास्थापनेबाबत कोणतीही चर्चा झाली नाही असं सांगण्यात आलं असलं तरी पडद्यामागून ही बोलणी सुरुच असल्याचं दिसून येतं. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची दिल्लीत १-२ दिवसांत बैठक होणार आहे. या बैठकीत कॉमन मिनिमम प्रॉग्रामवर अंतिम हात फिरवण्यात येणार आहे. या बैठकीत अंतिम मसुदा तयार करुन दोन्ही पक्षांच्या श्रेष्ठींची मान्यता घेण्यात येणार त्यानंतर पुढील बोलणीसाठी शिवसेनेशी चर्चा करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत दिल्लीत राजकीय घडामोडींनी वेग आला आहे. 



 

सोमवारी झालेल्या शरद पवारांच्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, आम्हाला राज्यपालांनी सहा महिन्याचा अवधी दिलेला आहे. आम्ही राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. शिवसेनेनं १७० आमदारांचा आकडा कुठून आणला याची कल्पना नाही, हा प्रश्न शिवसेना नेत्यांना विचारा असं पवार म्हणाले मात्र पत्रकारांनी सांगितलं की, काँग्रेस-राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे असा दावा शिवसेना करतंय त्यावर पवारांनी आम्ही सगळ्यांसोबत आहोत असं सांगितल्याने पत्रकार परिषदेत हास्यकल्लोळ झाला होता. 

यानंतर पत्रकारांनी राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या समन्वय समितीची बैठक झाली यात कॉमन मिनिमम प्रॉग्रामवर चर्चा झाली असल्याचं सांगण्यात आलं मात्र पवारांनी या प्रश्नावर दिलेल्या उत्तराने सगळेच अवाक् झाले. काही ठरलेलंच नाही, तर कशासाठी 'कॉमन मिनिमम प्रॉग्राम' करू, राज्यातील स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी विधानसभा सदस्य म्हणून ते भेटले होते असा दावा शरद पवारांनी केला होता. मात्र पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर संजय राऊतांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतरही संजय राऊत यांनी राज्यात लवकरच शिवसेनेच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार येईल. राज्यातील राष्ट्रपती राजवट संपुष्टात आणण्यासाठी आमचं एकमत आहे असंही राऊतांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे राज्यातील सत्तास्थापनेसाठी दिल्लीत पडद्यामागून बऱ्याच हालचाली सुरु आहेत हे स्पष्ट झालं आहे. 

Web Title: Maharashtra Election, Maharashtra Government: Give final shape to the Common Minimum Program of NCP-Congress in 2 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.