Maharashtra CM: फडणवीस सरकारविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; २४ तासांत बहुमत सिद्ध करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 07:38 PM2019-11-23T19:38:15+5:302019-11-23T19:39:06+5:30

Maharashtra News: मात्र भाजपाच्या या खेळीविरोधात महाविकासआघाडीने सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत.

Maharashtra CM: Supreme Court Petition Against Fadnavis Government; Demand to prove majority within 24 hours | Maharashtra CM: फडणवीस सरकारविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; २४ तासांत बहुमत सिद्ध करण्याची मागणी

Maharashtra CM: फडणवीस सरकारविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; २४ तासांत बहुमत सिद्ध करण्याची मागणी

Next

दिल्ली - राज्यातील सत्तास्थापनेच्या संघर्षात भाजपाने अजित पवारांशी हातमिळवणी करत राज्यात सरकार स्थापनेचा दावा केला आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्रिपदी अजित पवारांना शपथ देण्यात आली आहे. एका रात्रीत घडलेल्या या घडामोडीमुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांना मोठा धक्का बसला आहे. 

मात्र भाजपाच्या या खेळीविरोधात महाविकासआघाडीने सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत.  यामध्ये काँग्रेस, शिवसेनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्यपालांनी केंद्र सरकारकडे राष्ट्रपती राजवट हटवण्याची शिफारस किती वाजता केली? केंद्र सरकारने राष्ट्रपतींना राष्ट्रपती राजवट हटवण्याची शिफारस कधी केली? राष्ट्रपतींनी केंद्राची शिफारस कधी स्वीकारली? राज्यपालांनी कोणत्या पत्राद्वारे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना शपथविधीसाठी निमंत्रण दिलं? मुख्य न्यायाधिशांना शपथविधीला बोलवण्यात आलं नाही? शपथविधी किती वाजता झाली? माध्यमांना का बोलवण्यात आलं नाही? असे असंख्य प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. 

तसेच या याचिकेत विधानसभेचं अधिवेशन तातडीने बोलवावं, २४ तासांत फडणवीस सरकारने बहुमत सिद्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सभागृहात आवाजी मतदानाने ठराव संमत करू नये. या संपूर्ण घडामोडीचे व्हिडीओ चित्रीकरण कराव अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. 

दरम्यान, अजित पवारांसोबत १०-११ आमदार शपथविधी सोहळ्यात उपस्थित होते. त्यामुळे अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे आमदार फुटल्याची चर्चा सांगण्यात आली. मात्र शरद पवारांनी अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांशी संवाद साधला. यातील आतापर्यंत ७ आमदार पक्षात पुन्हा परतले आहेत. यामध्ये दिलीप बनकर, नानासाहेब झिरवळ, माणिकराव कोकाटे, संदीप क्षीरसागर, सुनील भुसारा, डॉ. राजेंद्र शिंगणे आणि सुनील शेळके असे आमदार राष्ट्रवादीसोबत कायम राहिलेले आहेत. 

मात्र या सर्व घडामोडीत काँग्रेस-शिवसेनेनेही आपले आमदार फुटू नये याची खबरदारी घेतली आहे. काँग्रेस-शिवसेना, राष्ट्रवादी आमदारांना एकाच ठिकाणी नेण्याबाबत विचार सुरु आहे. पण अजित पवारांसोबत किती आमदार आहेत याची स्पष्टता नाही, त्यामुळे अजित पवार नेमकी काय राजकारण करतात हे आगामी काळात स्पष्ट होईल.  
 

Web Title: Maharashtra CM: Supreme Court Petition Against Fadnavis Government; Demand to prove majority within 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.