बिहार, दिल्ली आणि अमेरिकेतील निवडणुकांकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 03:11 AM2020-01-01T03:11:53+5:302020-01-01T03:13:02+5:30

नव्या वर्षात दिल्ली आणि बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

Look at elections in Bihar, Delhi and US | बिहार, दिल्ली आणि अमेरिकेतील निवडणुकांकडे लक्ष

बिहार, दिल्ली आणि अमेरिकेतील निवडणुकांकडे लक्ष

Next

- समीर परांजपे

नुकत्याच पार पडलेल्या झारखंड विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा दणदणीत पराभव झाला. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, महाराष्ट्र यांच्यापाठोपाठ भाजपने झारखंडही गमावले. या निकालांतून देशात सत्ताधारी भाजपविरोधात वातावरण असल्याचे दिसत आहे. अशा स्थितीत नव्या वर्षात दिल्ली आणि बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. मागील निवडणुकीत दिल्लीत आम आदमी पक्षाने भाजपचा जोरदार पराभव केला होता. अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री बनले होते. बिहारमध्येही मागील खेपेस जनता दल युनायटेड, लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांच्या महागठबंधनने सत्ता मिळविली होती, परंतु पुढे महागठबंधन फिस्कटले आणि नितीशकुमार यांनी भाजपशी हातमिळवणी करून आपली सत्ता टिकविली होती, परंतु झारखंडच्या निकालानंतर नितीशकुमार भाजपविरोधात आक्रमकपणे बोलू लागले आहेत. जदयुचे अन्य नेते अधिक जागांसाठी भाजपवर दबाव टाकू लागले आहेत. त्यामुळे बिहारमध्येही भाजपपुढे आव्हानांची मालिका उभी असल्याचे दिसत आहे.

भारतात २०२० साली दिल्ली व बिहार मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. दिल्लीत फेब्रुवारी महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. नायब राज्यपाल केंद्राच्या इशाऱ्यावरून दिल्ली सरकारच्या कारभारात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आंदोलन केले होते. दिल्लीतील जनतेसाठी मोहल्ला दवाखाने, प्रदूषणाची समस्या कमी करण्यासाठी लागू केलेली सम-विषम योजना, ई-गव्हर्नन्सची राबविलेली प्रभावी योजना आप सरकारने राबविल्या. केंद्र सरकारवर अनेक मुद्द्यांवरून नाराज असलेली जनता दिल्लीतील विधानसभा निवडणुकांत आप पक्षाला पुन्हा संधी देते की, भाजपच्या हाती सत्ता सोपविते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. बिहारमध्ये येत्या आॅक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका होतील. बिहारमध्ये सध्या जनता दल (यू) व भाजपचे आघाडी सरकार अस्तित्वात आहे. झारखंडमध्ये जसा सत्तापालट झाला, तसे बिहारमध्ये घडल्यास देशातील भाजपविरोधी राजकारणाला वेगळे वळण लागू शकते.

इस्राएलमध्ये २ मार्च, २०२० रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांत विद्यमान पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या लिकूड पक्षाला किंवा विरोधातील ब्लू-व्हाइट आघाडीने समसमान जागा जिंकल्या. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात पुन्हा झालेल्या निवडणुकांत लिकूड व ब्लू-व्हाइट आघाडीने अगदी थोड्या फरकाने जागा जिंकल्या. या दोन्ही बाजू एकत्र येऊन राष्ट्रीय सरकार स्थापन करायला तयार नाहीत. त्यामुळे इस्राएलवर पुन्हा मार्चमध्ये निवडणुका थोपविल्या गेल्या. तैवानमध्ये ११ जानेवारीला राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत चीन किती हस्तक्षेप करतो, याकडे जगाचे लक्ष राहाणार आहे. आफ्रिकेतील गिनिआ देशात जानेवारी, २०१९ रोजी होणारी सार्वत्रिक निवडणूक दोनदा पुढे ढकलण्यात आली होती. ती आता १६ फेब्रुवारीला होत आहे. त्याशिवाय इथिओपिया, सिंगापूरमध्ये मे महिन्यात तर म्यानमार, बुर्किना फासो येथे नोव्हेंबर महिन्यात सार्वत्रिक निवडणुका, दक्षिण कोरियात १५ एप्रिलला विधिमंडळ निवडणुका आहेत.

ट्रम्प यांचे काय होणार?
अमेरिकेमध्ये २०१६ साली अध्यक्षपदाच्या निवडणुकांत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले. मात्र, धसमुसळ्या स्वभाव व कारभारामुळे ते अतिशय वादग्रस्त ठरले. त्यांच्यावर महाभियोगाची प्रक्रियाही झाली आहे. अमेरिकेत ३ नोव्हेंबरला होणाºया राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प पुन्हा निवडून येऊ शकतील, असेही म्हटले जाते. अमेरिकेच्या मूळ नागरिकांना अग्रक्रम, तसेच दुसºया देशांतील लोक अटकाव असे ट्रम्प यांचे स्वदेशी धोरण आहे. त्यामुळे ट्रम्पवर अनेक देश नाराज आहेत.

Web Title: Look at elections in Bihar, Delhi and US

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.