कर्नाटकमध्ये माजी पंतप्रधान आजोबांसह नातवाचाही झाला दारुण पराभव 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 10:00 PM2019-05-23T22:00:18+5:302019-05-23T22:01:09+5:30

आज लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांच्या नातेवाईकांना पराभव पत्करावा लागला आहे.

Lok Sabha Election 2019 Results : In Karnataka, grandfathers and grandson were defeated | कर्नाटकमध्ये माजी पंतप्रधान आजोबांसह नातवाचाही झाला दारुण पराभव 

कर्नाटकमध्ये माजी पंतप्रधान आजोबांसह नातवाचाही झाला दारुण पराभव 

बंगळुरू - आज लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांच्या नातेवाईकांना पराभव पत्करावा लागला आहे. त्यामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांचा पराभव धक्कादायक ठरला आहे. शरद पवार यांच्याप्रमाणेच माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या नातवालाही पराभव पत्करावा लागला आहे. नातवासोबतच एच. डी. देवेगौडा हेसुद्धा पराभूत झाले. 

जनता दल सेक्युलरचे नेते आणि देशाचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचे पुत्र निखिल कुमार स्वामी हे मांड्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. या ठिकाणी अपक्ष उमेदवार सुमालथा अम्बरिश यांचे त्यांच्यासमोर आव्हान होते. 

दरम्यान, आज झालेल्या मतमोजणीमध्ये सुमलथा अम्बरिश यांनी जोरदार मुसंडी मारली. मतमोजणीच्या अखेरीस सुमलथा अम्बरिश यांना 7 लाख  3 हजार 6660 मते मिळाली तर निखिल कुमारस्वामी यांना 5 लाख 77 हजार 784 मते मिळाली. अशाप्रकारे सुमलथा अम्बरिश यांनी 1 लाख 58 हजार 876 मतांनी विजय मिळवला. 

देवेगौडा कुटुंबीयांना आजचा दिवस पराभवाचा दुहेरी धक्का देणारा ठरला. मांड्या मतदारसंघातून निखिल कुमारस्वामी पराभूत झाले, तर एच. डी. देवेगौडा यांना  तुमकूर मतदारसंघात पराभवाचा धक्का बसला. माजी पंतप्रदान एच. डी. देवेगौडा यांना अटीतटीच्या लढतीमध्ये भाजपाच्या जी. एस. बसवराज यांनी पराभूत केले. 13 हजार 339 मतांनी बसवराज विजयी झाले. 

Web Title: Lok Sabha Election 2019 Results : In Karnataka, grandfathers and grandson were defeated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.