नशीबवान! ...अन् क्षणात संपली गरिबी; २०० रुपयांने मजुराचं कुटुंब झालं करोडपती; जिंकले १.५ कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 13:12 IST2025-12-09T13:11:11+5:302025-12-09T13:12:23+5:30
शेती आणि मजूर म्हणून काम करून कुटुंबाचं पालनपोषण करणाऱ्या नसीब कौर नावाच्या महिलेने तब्बल १.५ कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आहे.

फोटो - ABP News
पंजाबमधील फरीदकोट येथून हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. शेती आणि मजूर म्हणून काम करून कुटुंबाचं पालनपोषण करणाऱ्या नसीब कौर नावाच्या महिलेने तब्बल १.५ कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आहे. आधीच आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या या कुटुंबासाठी ही गोष्ट वरदानापेक्षा कमी नाही.
नसीब कौरचा पती राम सिंग गेल्या चार वर्षांपासून लॉटरीची तिकिटं खरेदी करत होता. तो नेहमीच स्वतःच्या नावाने तिकिटं खरेदी करायचा, पण यावेळी त्याने त्याच्या पत्नीच्या नावाने २०० रुपयांचं मंथली तिकीट खरेदी केलं. नशिबाने ठरवल्याप्रमाणे त्याच तिकिटाने करोडो रुपये जिंकले. राम सिंह म्हणाला की, त्याला नेहमीच आशा होती की एक दिवस नशीब त्याला साथ देईल.
घरची परिस्थिती अत्यंत बिकट
लॉटरी जिंकण्यापूर्वी हे कुटुंब अत्यंत गरिबीत राहत होतं. पती-पत्नी स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी शेतात काम करत होते. परिस्थिती इतकी बिकट होती की त्यांच्याकडे मोबाईलही नव्हता. माहिती मिळताच दुकानदाराने त्यांच्या घरी जाऊन लॉटरी जिंकल्याची माहिती दिली. राम सिंगने स्पष्ट केलं की त्याने सादिकच्या दुकानातून तिकीट खरेदी केलं आहे. दुकानदाराने त्यांच्याशी अनेक वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु मोबाईल नसल्याने तो संपर्क करू शकला नाही. शेवटी जेव्हा लॉटरीचा निकाल लागला तेव्हा तो स्वतः त्यांच्या घरी गेला.
लॉटरीमुळे पालटलं नशीब
नसीब कौर आणि पती राम सिंग, आयुष्यात पहिल्यांदाच चंदीगडला पोहोचले, जिथे त्यांनी लॉटरी जिंकल्यानंतर आवश्यक कागदपत्रं दिली. हे कपल खूप साधं जीवन जगतं आणि मोठ्या शहरांमध्ये प्रवास करण्याचा कोणताही अनुभव नव्हता. तरीही ते आशेने चंदीगडला पोहोचले आणि जेव्हा त्यांना पैसे मिळाले तेव्हा ते आनंदाने परतले. नसीब कौरला चार मुलं आहेत.