Kill Those Who Have Looted Kashmir says jammu kashmir Governor Malik To Terrorists | 'दहशतवाद्यांनो, जवानांना मारण्यापेक्षा काश्मीर लुटणाऱ्यांना ठार करा'
'दहशतवाद्यांनो, जवानांना मारण्यापेक्षा काश्मीर लुटणाऱ्यांना ठार करा'

श्रीनगर: जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक पुन्हा एकदा वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. दहशतवाद्यांनी पोलीस, जवान यांच्याऐवजी भ्रष्ट राजकीय नेत्यांच्या हत्या कराव्यात, असं वक्तव्य मलिक यांनी केलं. कारगिलवरील भाषणादरम्यान त्यांनी हे विधान केलं.
 
'ही मुलं (दहशतवादी) विनाकारण आपल्या माणसांना मारतात. पीएसओ, एसडीओंच्या हत्या करतात. त्यांना तुम्ही का मारताय? त्यापेक्षा ज्यांनी तुमचा देश लुटला त्यांना मारा. ज्यांनी काश्मीरमधील संपत्ती लुटली, त्यांचा खात्मा करा. अशांपैकी एकाला तरी तुम्ही मारलंय का? बंदूक हातात घेऊन काहीही साध्य होणार नाही,' असं सत्यपाल सिंह म्हणाले. 
शुक्रवारी अनंतनागमध्ये जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या काकांच्या मुलाच्या सुरक्षा रक्षकाची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्या हत्येच्या संदर्भात मलिक यांनी हे विधान केल्याचं बोललं जात आहे. दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकाची रायफल घेऊन त्याला ठार केलं. याशिवाय अनंतनागमधील बिजबेहरा शहरात पीडीपीचे वरिष्ठ नेते सज्जाद मुफ्ती यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या हवालदारावरदेखील दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. 

राज्यपाल सत्यपाल सिंह याआधीही वादग्रस्त विधानामुळे अनेकदा अडचणीत सापडले आहेत. दहशतवाद्यांच्या मृत्यूनं मला दु:ख होतं, असं वक्तव्य मलिक यांनी जानेवारीत केलं होतं. 'पोलीस आपलं काम अगदी व्यवस्थित करत आहेत. मात्र एक जरी जीव गेला, मग तो दहशतवाद्याचा का असेना, त्यानं मला दु:ख होतं,' असं मलिक म्हणाले होते. 


Web Title: Kill Those Who Have Looted Kashmir says jammu kashmir Governor Malik To Terrorists
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.