Karnataka Lok Sabha election result 2019: JDS-Congress cleared; South gate open for BJP | कर्नाटक लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : जेडीएस-कॉँग्रेस झाले साफ; भाजपसाठी उघडले दक्षिणद्वार
कर्नाटक लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : जेडीएस-कॉँग्रेस झाले साफ; भाजपसाठी उघडले दक्षिणद्वार

- संतोष मोरबाळे
कर्नाटक राज्य हे अनेक वर्षे ‘कॉँग्रेसचा बालेकिल्ला’ म्हणून ओळखला जात होते. मात्र, २००७ मध्ये भाजपने या राज्यात विजय मिळवत दक्षिणेकडील राज्यात प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत भाजपच्या विजयाचा आलेख चढताच राहिला. विधानसभेनंतर वर्षभरातच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने २५ जागा जिंकत कॉँग्रेस-जनता दल युतीचा धुव्वा उडविला. जनता दल व कॉँग्रेस यांना प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवता आला. मंड्यामधून मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे पुत्र निखिल यांचा भाजप पुरस्कृत सुमलता अंबरिश यांनी पराभव केला.

लोकसभेच्या २८ पैकी कॉँग्रेसने २० तर निधर्मी जनता दलाने (जेडीएस) ८ जागांवर निवडणूक लढवली. भाजपने २७ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. भाजपचा वारू रोखण्यासाठी कॉँग्रेस व जेडीएसने निवडणूकपूर्व युती केली होती. मात्र, ही युती लोकांना आवडल्याचे दिसले नाही.

सन २०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने १०४ जागा जिंकत ‘राज्यातील सर्वांत मोठा पक्ष’ म्हणून सत्तास्थापनेचा दावा केला. मात्र, कॉँग्रेसने जेडीएसच्या साह्याने राज्यातील सत्ता हस्तगत केली. मात्र, सत्तास्थापनेच्या पहिल्या दिवसापासूनच या दोन्ही पक्षांतील नेत्यांचे सूत जमलेच नाही.
नेमक्या हीच बाब भाजपने लोकांसमोर प्रभावीरित्या मांडली. देवेगौडा कुटुंबीयांच्या घराणेशाहीविरुद्धही लोकांमध्ये मोठी नाराजी होती. त्याचाच फटका माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनाही बसला. तुमकूर मतदारसंघातून त्यांना पराभव पत्करावा लागला.

निकालाची कारणे
विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वांत मोठा पक्ष असूनही सत्तेबाहेर ठेवल्याने लोकांमध्ये नाराजी
राज्यातील सत्ता स्थापनेनंतर कॉँग्रेस- जेडीएस नेत्यांमध्ये वारंवार वाद. त्याचा परिणाम राज्यातील विकासावर झाला.
भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी केलेल्या कॉँग्रेस-जेडीएस आघाडीच्या कारभारावर प्रचंड नाराजी.


Web Title: Karnataka Lok Sabha election result 2019: JDS-Congress cleared; South gate open for BJP
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.