डीके शिवकुमारांना मुख्यमंत्रिपदाची संधी कधी मिळणार? CM सिद्धारमैया थेट बोलले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 14:41 IST2025-12-02T14:37:43+5:302025-12-02T14:41:07+5:30
गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.

डीके शिवकुमारांना मुख्यमंत्रिपदाची संधी कधी मिळणार? CM सिद्धारमैया थेट बोलले...
Karnataka Leadership Row: कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला अंतर्गत मतभेदांचा मुद्दा आता निवळत असल्याचे संकेत मिळत आहेत. पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या सूचनेनंतर मुख्यमंत्री सिद्धरामैया आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार हे अल्पावधीत दोन वेळा एकमेकांच्या निवासस्थानी भेटले. दोन्ही नेत्यांनी सार्वजनिकरीत्या एकतेचा संदेश देत “आमच्यात कोणताही मतभेद नाही” असे स्पष्ट केले.
सिद्धरामैयांचा शिवकुमारांच्या निवासस्थानी दौरा
मुख्यमंत्री सिद्धरामैया मंगळवारी उपमुख्यमंत्री शिवकुमार यांच्या सदाशिवनगर येथील निवासस्थानी पोहोचले. शिवकुमार आणि त्यांचे भाऊ व माजी खासदार डी.के. सुरेश यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी एकत्र नाश्ता करत पक्षीय विषयांवर चर्चा केली.
#WATCH | Bengaluru, Karnataka | When media asked CM Siddaramaiah when Dy CM DK Shivakumar will become Chief Minister, he says, "When the High Command says..." pic.twitter.com/gSer7e3hYd
— ANI (@ANI) December 2, 2025
नंतर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सिद्धरामैयांनी सांगितले की, आम्ही एकत्र नाश्ता केला आणि पक्षाच्या कामांवर तसेच ८ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या रणनीतीवर चर्चा केली. आम्ही एकत्र आहोत, एकजुटीने काम करत आहोत.
‘शिवकुमार कधी मुख्यमंत्री होतील?’
शिवकुमार मुख्यमंत्री कधी होणार, असा प्रश्न विचारला असता सिद्धरामैयांनी उत्तर दिले, हायकमांड जेव्हा सांगेल, तेव्हा. त्यांनी हेदेखील म्हटले की, पक्षश्रेष्ठींनी बोलावल्यास ते भेटण्यासाठी नक्की दिल्लीला जातील.
हायकमांडच्या हस्तक्षेपानंतर वाढत्या भेटी
कर्नाटकात नेतृत्व बदलाच्या चर्चेमुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील पक्ष नेतृत्वाने दोन्ही नेत्यांना एकमेकांना भेटण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने मागील चार दिवसांत हे दोघे दोनदा नाश्ता-भेटीसाठी एकत्र आले.
‘आम्ही भाऊ, एकत्र सरकार चालवणार’
अंतर्गत कलहाच्या बातम्या समोर आल्यापासून दोन्ही नेते सतत एकजुटीचा संदेश देत आहेत. शिवकुमार म्हणाले, मी आणि मुख्यमंत्री मिळून एक टीम म्हणून काम करत आहोत. आम्ही कर्नाटकमध्ये केलेल्या वचनांची पूर्तता करण्यासाठी संयुक्त प्रयत्नांची रणनीती आखत आहोत. सिद्धरामैया यांनीही याला पुष्टी देत सांगितले, आम्ही भाऊ आहोत. आमच्यात मतभेद नाहीत. सरकार एकत्र चालवत आहोत आणि पुढेही तसेच चालवू.
काँग्रेसमधील तणाव सध्या तरी कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, पुढील काही महिन्यांत नेतृत्वाचा मुद्दा पुन्हा समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.