कर्नाटक विधानसभा पोटनिवडणूक : स्वपक्षीयांनी वाढवली भाजपाची चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 11:24 AM2019-11-18T11:24:05+5:302019-11-18T11:24:49+5:30

गेल्या दीड वर्षांपासून राजकीय अस्थिरतेचा अनुभव घेत असलेल्या कर्नाटकमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.

Karnataka Assembly by-election: Rebel leader raised concern of BJP | कर्नाटक विधानसभा पोटनिवडणूक : स्वपक्षीयांनी वाढवली भाजपाची चिंता

कर्नाटक विधानसभा पोटनिवडणूक : स्वपक्षीयांनी वाढवली भाजपाची चिंता

Next

बंगळुरू - गेल्या दीड वर्षांपासून राजकीय अस्थिरतेचा अनुभव घेत असलेल्या कर्नाटकमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. कर्नाटकमधील विधानसभेच्या १५ जागांसाठी ५ डिसेंबर रोजी पोटनिवडणूक होत असून,  राज्यातील सरकार टिकवण्यासाठी सध्या सत्तेवर असलेल्या येडियुरप्पा आणि भाजपाला या निवडणुकीत चांगली कामगिरी करावी लागणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपाने काँग्रेस आणि जेडीएसमधून बंडखोरी करून पक्षात आलेल्या अपात्र आमदारांना उमेदवारी दिली आहे. मात्र पक्षांतर करून आलेल्या नेत्यांना उमेदवारी दिल्याने भाजपामधील अनेक नेते नाराज झाले असून, त्यांच्या नाराजीमुळे पोटनिवडणुकीपूर्वी भाजपाची चिंता वाढली आहे.

 २२४ सदस्य असलेल्या कर्नाटकच्या विधानसभेत बहुमताचा आकडा ११३ आहे. मात्र जुलै महिन्यात काँग्रेस आणि जेडीएसच्या काही आमदारांनी बंडखोरी केल्याने या आमदारांना विधानसभाध्यक्षांनी अपात्र ठरवले होते. या राजकीय नाट्यात कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील जेडीएस-काँग्रेस सरकार कोसळले होते. त्यानंतर येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे  सरकार स्थापन झाले होते. तसेच घटलेल्या सदस्यसंख्येचा फायदा घेत येडियुरप्पा यांनी बहुमतही सिद्ध केले होते. मात्र आता राज्यातील सरकार कायम ठेवण्यासाठी भाजपाला होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत किमान ६ ते ८ जागांवर विजय मिळवावा लागणार आहे.

विधानसभा पोटनिवडणुकीसाठी १५ पैकी १३ जागांवर भाजपाने काँग्रेस आणि जेडीएसमधून बंडखोरी करून पक्षात आलेल्या अपात्र आमदारांना उमेदवारी दिली आहे. मात्र या १५ पैकी ६ ठिकाणी तिकीट मिळण्याची अपेक्षा असलेल्या भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी बंडाचा पावित्रा घेतला आहे. यापैकी अनेक नेत्यांना या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता.

दरम्यान, पक्षातील बंडखोरी थांबवण्यासाठी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी बंडाच्या पावित्र्यात असलेल्या नेत्यांची भेट घेण्यास सुरुवात केली आहे. ये़डियुरप्पा यांनी बंगळुरूमधील महालक्ष्मी लेआऊट आणि यशवंतपूर येथील बंडखोरांची भेट घेतली आहे. तिकीट न मिळाल्याने नाराज असलेल्य़ा काही नेत्यांनी पक्षाविरोधात भूमिका घेणार नसल्याचे सांगितले आहे. मात्र बाहेरून आलेल्य़ा नेत्यांच्या प्रचाराबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

 पोटनिवडणूक होत असलेल्या मतदारसंघांपैकी होस्पोटमधून शरद बचे गौडा यांनी भाजपा उमेदवार एमटीबी राजू यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. तर विजयनगरमधून कविराज उर्स आणि रानेबेनूर येथून बसवराज केलागर हे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.

Web Title: Karnataka Assembly by-election: Rebel leader raised concern of BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.