हिंमत असेल तर गोडसेला दहशतवादी म्हणा; सिब्बल यांचं अमित शहांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 08:21 PM2019-08-01T20:21:22+5:302019-08-01T20:26:23+5:30

बेकायदा हालचाली प्रतिबंधक सुधारणा विधेयकावरुन राज्यसभेत वादळी चर्चा

kapil Sibal challenges Amit Shah over discussion in rajya sabha over uapa amendment bill | हिंमत असेल तर गोडसेला दहशतवादी म्हणा; सिब्बल यांचं अमित शहांना आव्हान

हिंमत असेल तर गोडसेला दहशतवादी म्हणा; सिब्बल यांचं अमित शहांना आव्हान

googlenewsNext

नवी दिल्ली: बेकायदा हालचाली प्रतिबंधक सुधारणा विधेयकावरुन राज्यसभेत काँग्रेस आणि भाजपामध्ये चांगलीच जुंपली. दहशतवादाला पायबंद घालण्यासाठी सुधारणा विधेयक आणल्याचा दावा भाजपानं केला. त्यावरुन काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना लक्ष्य केलं. हिंमत असेल तर नथुराम गोडसेला दहशतवादी म्हणून दाखवा, असं थेट आव्हान सिब्बल यांनी शहांना दिलं. 

सरकार नेमक्या कोणत्या स्तरावर एखाद्या व्यक्तीला दहशतवादी घोषित करणार, असा सवाल सिब्बल यांनी उपस्थित केला. 'दहशतवादी घोषित करण्यात आल्यास संबंधित व्यक्ती अपील करू शकते किंवा लवादाकडे दाद मागू शकते, असा उल्लेख विधेयकात आहे. मात्र त्या व्यक्तीला केव्हा आणि का दहशतवादी घोषित केलं जाणार, याचा उल्लेख त्यात नाही. तुम्ही एफआयआरनंतर संबंधित व्यक्तीला दहशतवादी ठरवणार की आरोपपत्र दाखल केल्यावर की संपूर्ण सुनावणी पार पडल्यानंतर, यावर विधेयकात कोणतीही माहिती नाही', असं सिब्बल म्हणाले. 

एखाद्या व्यक्तीचा गुन्हा सिद्ध होईपर्यंत ती व्यक्ती निर्दोष असते असं आपला कायदा मानतो. मग तुम्ही सुनावणी सुरू असताना एखाद्या व्यक्तीला दहशतवादी कसं काय ठरवू शकता, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तुमच्या दृष्टीकोनावर संबंधित व्यक्ती दहशतवादी आहे की नाही हे ठरतं, असं म्हणत सिब्बल यांनी हाफिज सईद आणि नथुराम गोडसेंची अप्रत्यक्ष तुलना केली. हाफिज सईद दहशतवादी आहे. गोडसेदेखील दहशतवादी आहे. पण ते बोलण्याची हिंमत तुमच्यात नाही. १९४७ पासून तशी हिंमत तुम्हाला दाखवता आली नाही. तुमच्यात हिंमत असेल, तर गोडसेला दहशतवादी म्हणून दाखवा. एखाद्याला दहशतवादी ठरवताना तुमचा त्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टीकोन महत्त्वाचा असतो, असं सिब्बल यांनी म्हटलं. 
 

Web Title: kapil Sibal challenges Amit Shah over discussion in rajya sabha over uapa amendment bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.