kanhaiya kumar hits out at modi government over citizen amendment bill | 'मागची 5 वर्षं आधार लिंक करण्यात गेली; आता पुढची 5 वर्षं जन्मदाखले मिळवण्यात जातील'
'मागची 5 वर्षं आधार लिंक करण्यात गेली; आता पुढची 5 वर्षं जन्मदाखले मिळवण्यात जातील'

पाटणा: जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमारनं नागरिकत्व सुधारणा विधेयक आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीवरुन मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. कन्हैयानं दोन ट्विट करुन सरकारवर तोफ डागली आहे. देशातलं राष्ट्रवादी सरकार सार्वजनिक क्षेत्राला चार-आठ आण्याला विकून टाकेल, अशा शब्दांत कन्हैयानं सरकारवर टीका केली आहे. कन्हैयानं त्याच्या पहिल्या ट्विटमधून सार्वजनिक क्षेत्राचं खासगीकरण, शिक्षण आणि रोजगारांवर भाष्य केलं आहे. 'मागील ५ वर्षे आधार कार्ड आणि पॅन कार्ड जोडण्यात गेली. आता पुढील ५ वर्ष आजोबांच्या आजोबांचे जन्मदाखले तयार करण्यात जातील. याच काळात राष्ट्रवादी सरकार सार्वजनिक क्षेत्राला चार-आठ आण्यात विकेल आणि ट्रेनच्या तिकीटापासून महाविद्यालयाच्या पदवीपर्यंत सर्व काही गरिबांच्या आवाक्याबाहेर जाईल,' असं कन्हैयानं ट्विटमध्ये म्हटलं आहे. दुसऱ्या ट्विटमधूनही कन्हैया कुमारनं खासगीकरणावरुन मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. 'देशवासीयांना कागदपत्रं मिळवण्यासाठी विविध सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवायला लागतील. या सर्व गदारोळात ओएनजीसी, बीएसएनएल, एअर इंडिया, रेल्वेची विक्री झालेली असेल. त्यानंतर खासगी तेजस एक्स्प्रेसमधून ४०० रुपयांऐवजी ४००० रुपयांचं तिकीट काढून प्रवास करावा लागेल आणि १० लाख रुपये खर्च करुन पदवी घेतलेला तरुण १० हजार रुपये महिना पगाराची नोकरी करेल,' अशा शब्दांमध्ये कन्हैयानं मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

Web Title: kanhaiya kumar hits out at modi government over citizen amendment bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.