"मला माझा वाटा हवा", नवऱ्याला जमिनीचे ४६ लाख मिळताच परतली बॉयफ्रेंडसोबत पळालेली बायको
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 11:54 IST2025-12-09T11:53:09+5:302025-12-09T11:54:54+5:30
पाच वर्षांपूर्वी बॉयफ्रेंडसोबत घर सोडून गेलेली महिला अचानक परत आली आहे आणि तिच्या पतीला जमिनीचा मोबदला म्हणून मिळालेल्या ४५-५० लाखांत आता वाटा मागत आहे.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये एक अजब घटना समोर आली आहे. पाच वर्षांपूर्वी बॉयफ्रेंडसोबत घर सोडून गेलेली महिला अचानक परत आली आहे आणि तिच्या पतीला जमिनीचा मोबदला म्हणून मिळालेल्या ४५-५० लाखांत आता वाटा मागत आहे. महिलेचा दावा आहे की, तिला आणि तिच्या मुलाला यातील एक तृतीयांश भाग मिळाला पाहिजे.
पतीने पैसे देण्यास नकार दिला आहे. पत्नी गेल्या अनेक वर्षांपासून तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहत होती. त्यामुळे तिला कोणतेही अधिकार नाहीत. हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचल्यावर दोन दिवसांची पंचायत निष्फळ ठरली. आता संपूर्ण परिसरात याची चर्चा रंगली आहे. झाशीच्या रक्षा पोलीस स्टेशन परिसरातील इमालिया गावातील रहिवासी सुरेंद्र अहिरवारला जमिनीसाठी ४६ लाख रुपये देण्यात आले, त्यापैकी २० लाख रुपये नुकतेच सुरेंद्रच्या खात्यात आले.
पैशामुळे सुरेंद्रच्या आयुष्यात एक नवीन बदल घडला आहे. सुरेंद्रने दहा वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील भोपाळपुरा निवारी येथील रहिवासी पुष्पा हिच्याशी लग्न केलं. त्यांना एक मुलगा आहे. सुरेंद्र म्हणतो की त्यांच्या लग्नाची सुरुवातीची वर्षे चांगली गेली, परंतु काही काळानंतर त्याच्या पत्नीचं वागणं बदलू लागलं. ती घरी भांडायची, आत्महत्येचा प्रयत्न करायची आणि तिच्या पालकांकडे खोट्या तक्रारी दाखल करायची.
२०२० मध्ये पत्नी आकाश नावाच्या तरुणाशी जवळीक साधू लागली आणि अचानक त्याच्यासोबत राहण्यासाठी निघून गेली, मुलालाही सोबत घेऊन गेली. सुरेंद्र जवळजवळ दोन वर्षे वाट पाहत राहिला पण ती परत आली नाही. अखेर त्याने न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला. पण आता जमिनीचे पैसे खात्यात जमा झाल्यावर अचानक पत्नी घरी आली आणि पैशाची मागणी केली. आता याप्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.