Video - मोठा आवाज आला अन् धुराळा उडाला; ५ सेकंदात पत्त्यासारखं कोसळलं ५ मजली हॉटेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 19:29 IST2025-12-07T19:27:23+5:302025-12-07T19:29:06+5:30
बेसमेंटच्या खोदकामावेळी भिंतींना भेगा पडल्या, ज्यामुळे इमारत एका बाजूला झुकली.

Video - मोठा आवाज आला अन् धुराळा उडाला; ५ सेकंदात पत्त्यासारखं कोसळलं ५ मजली हॉटेल
जयपूरच्या मालवीय नगर सेक्टर ९ मध्ये बांधकाम सुरू असलेलं ५ मजली हॉटेल झुकू लागलं, मात्र योग्य वेळीच लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली. बेसमेंटच्या खोदकामावेळी भिंतींना भेगा पडल्या, ज्यामुळे इमारत एका बाजूला झुकली. याच दरम्यान जयपूर विकास प्राधिकरण (जेडीए) आणि प्रशासनाने ती योग्य पद्धतीने पाडण्याचा मोठा निर्णय घेतला. अवघ्या ५ सेकंदात संपूर्ण इमारत पत्त्यासारखी कोसळली.
भेगा पडताच आणि हॉटेल झुकू लागताच सर्व कामगार त्यांचं काम सोडून सुरक्षित ठिकाणी पळून गेले. स्थानिक रहिवाशांनी तात्काळ पोलीस आणि प्रशासनाला माहिती दिली. अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि खबरदारी म्हणून संपूर्ण परिसर रिकामा करण्यास सुरुवात केली. पाडण्याच्या तयारीसाठी दोन क्रेन तैनात करण्यात आल्या होत्या, परंतु वाढत्या धोक्यामुळे, जेडीएने संपूर्ण इमारत पाडण्याचा निर्णय घेतला. जेसीबी मशीनमुळे इमारतीखालील रचना कमकुवत झाली आणि काही क्षणातच हॉटेल कोसळलं.
#WATCH | जयपुर, राजस्थान: JDA ने कार्रवाई करते हुए मालवीय नगर में गिरधर मार्ग पर झुकी हुई पांच मंजिला इमारत को गिरा दिया।
\— ANI\_HindiNews (@AHindinews) December 7, 2025
NDRF, पुलिस और JDA की टीमों ने रात भर साइट पर नज़र रखी। शुरुआती जांच में पता चला कि बिना इजाज़त के बेसमेंट की खुदाई की जा रही थी, जिससे ढांचा कमज़ोर हो गया… pic.twitter.com/24YgHaYzMc
हॉटेल मालक घटनास्थळी पोहोचला आणि जेडीएच्या कारवाईचा निषेध केला. त्यांनी दावा केला की त्यांनी महानगरपालिकेकडून परवानगी घेतली आहे आणि १.२५ लाख जमा केले आहेत. तरीही हॉटेल बेकायदेशीर घोषित करण्यात आलं आणि ते पाडण्यात आलं. जेडीए झोन १ तहसीलदार शिवांग शर्मा यांनी सांगितलं की, हे हॉटेल निवासी क्षेत्रात बांधलं जात होतं, ज्यामध्ये व्यावसायिक गोष्टींसाठी नियमांचं उल्लंघन केलं जात होतं. शिवाय बेसमेंटचं खोदकाम केलं जात होतं आणि कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती.
९० यार्डच्या जागेवर हॉटेल वेगाने बांधलं जात होतं. अवघ्या सात महिन्यांत संपूर्ण पाच मजली इमारत पूर्ण झाली आणि काम जवळजवळ पूर्ण झालं. मात्र बेसमेंटच्या भिंतीला भेगांमुळे इमारतीला धोका निर्माण झाला. प्रशासनाने इमारतीचं पाडकाम केल्याने मोठी दुर्घटना टळली. या कारवाईनंतर रहिवासी आणि प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला.