Jainism also teaches the art of interviewing death; Rendering by Vijay Darda | जैन धर्म मृत्यूच्या साक्षात्काराची कलाही शिकवतो; विजय दर्डा यांचे प्रतिपादन
जैन धर्म मृत्यूच्या साक्षात्काराची कलाही शिकवतो; विजय दर्डा यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली : अणुव्रत भवनात महातपस्वी आचार्यश्री महाश्रमणजी यांच्या आज्ञानुवर्तिनी ‘शासनश्री’ साध्वीजी अशोकश्रीजी यांच्या दर्शनासाठी देशभरातील भाविक मोठ्या संख्येने पोहोचत आहेत. गुरु महाश्रमणजी यांच्या आज्ञेवरून पू. साध्वीश्री २० आॅक्टोबरपासून त्रिविहार संथारा व्रत करीत आहेत. गुरुवारी संध्याकाळी अ .भा. जैन समाजाचे अध्यक्ष, लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांनी अणुव्रत भवनात जाऊन साध्वीश्री अशोकश्रीजी यांचे दर्शन घेतले.

पू. साध्वीश्रींच्या संथारा व्रताची प्रशंसा करताना दर्डा म्हणाले, जैन धर्म वास्तवात जीवन जगण्याची कला शिकवतो. मृत्यूच्या साक्षात्काराची कलाही शिकवतो. संलेखनापूर्वक उपवास करून देहत्याग करणे हे सार्थक जीवनाचे सार आहे. साध्वीश्रीजींनी त्यागपूर्वक आत्मसमाधी मिळविण्यासाठी मोठ्या साहसाने मृत्यूला निमंत्रण दिले आहे.

साध्वीश्री महाज्ञानी आहेत. त्यांनी अनेक ग्रंथांचे पारायण केले असून अनेक पुस्तकेही लिहिली आहेत, असे याप्रसंगी दर्डा यांच्याशी बोलताना पू. साध्वीश्रीजींच्या सहकारी साध्वीश्री चिन्मयप्रभाजी यांनी सांगितले. काही वर्षांपूर्वी नागपुरात चातुर्मास घेतला होता. त्यावेळी विजय दर्डा यांच्या पत्नी ज्योत्स्ना दर्डा यांचा महत्त्वपूर्ण आणि सक्रिय सहभाग होता, याचे स्मरणही यावेळी करवून दिले. विजय दर्डा यांच्या सासू प्रेमबाई तसेच सुरेशदादा जैन, रमेशदादा जैन यांनी जळगाव येथे पू. आचार्यश्री महाप्रज्ञजी यांच्या पावन उपस्थितीत मर्यादा महोत्सव आयोजित केला होता, अशी माहिती ऐकून पूज्य साध्वीश्रींच्या चेहऱ्यावर प्रसन्नता झळकली. जैन श्वेतांबर तेरापंथी सभेचे अध्यक्ष तेजकरण सुराणा, महामंत्री विजय चोपडा, अमृतवाणीचे माजी अध्यक्ष सुखराज सेठिया, पुखराज सेठिया, मीडिया प्रभारी शीतल बरडिया, उपाध्यक्ष नरपत मालू आदी चर्चेच्यावेळी उपस्थित होते. संथारा व्रत करीत असलेल्या साध्वीश्री अशोकश्रीजी यांच्या समवेत त्यांच्या सहकारी साध्वी चिन्मयप्रभाजी, साध्वी मंजुयशश्री, साध्वी चारुप्रभाजी आणि साध्वी इंदुप्रभाजी या आहेत. जप आणि स्वाध्यायाचा क्रमही सुरू आहे.

Web Title: Jainism also teaches the art of interviewing death; Rendering by Vijay Darda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.