शॉकींग! मुस्लीम असल्याच्या संशयावरून भाजप नेत्याच्या मारहाणीत जैन वृद्धाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 09:05 AM2022-05-22T09:05:29+5:302022-05-22T09:06:27+5:30

भाजप नेत्याने आधार कार्ड मागितले : कानशिलात लगावल्या

Jain woman murdered in Madhya Pradesh on suspicion of being Muslim | शॉकींग! मुस्लीम असल्याच्या संशयावरून भाजप नेत्याच्या मारहाणीत जैन वृद्धाची हत्या

शॉकींग! मुस्लीम असल्याच्या संशयावरून भाजप नेत्याच्या मारहाणीत जैन वृद्धाची हत्या

Next

नीमच (मध्य प्रदेश) : मध्य प्रदेशातील सिरसाच्या वयोवृद्ध सरपंच पिस्ताबाई चत्तर (८६) यांचे ज्येष्ठ पुत्र भंवरलाल जैन (६५) यांचा भाजप नेत्याच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. मुस्लीम असल्याच्या संशयावरून त्यांची हत्या केली.

भाजप नेते दिनेश कुशवाहा यांनी वृद्धाला मारहाण केली. व्हिडिओत ते भंवरलाल यांच्याकडे आधार कार्ड दाखवण्याची मागणी करत त्यांना मारहाण करताना दिसून येत आहेत. दिनेशने नाव व पत्ता विचारला तर मानसिकदृष्ट्या कमकुवत भंवरलाल यांच्या तोंडातून मोहम्मद निघाले. हे ऐकून दिनेश त्यांच्यावर तुटून पडला. त्याने आधार कार्डाची मागणी करत भंवरलाल यांना लाथाबुक्क्या मारल्या. दिनेश भाजप युवा मोर्चा व नगर विभागातील पदाधिकारी आहे. त्याची पत्नी मनासा नगर परिषदेत नगरसेविका म्हणून निवडून आली होती. मृत भंवरलाल जैन हे रतलाम जिल्ह्यातील सरसी गावचे रहिवासी होते व १५ मे रोजी राजस्थानच्या चित्तोडगढमध्ये एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर बेपत्ता झाले होते. शुक्रवारी सकाळी नीमच जिल्ह्यातील मनासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामपुरा रस्त्यावर त्यांचा मृतदेह आढळला. राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले की, कुशवाहा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे व घटनेची चौकशी सुरू आहे.

मारहाण करणारा व व्हिडिओ करणारा फरार

मनासा पोलीस ठाण्याचे प्रभारी के. एल. डांगी यांनी म्हटले आहे की, मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर कुटुंबीयांना या व्हिडिओबाबत माहिती मिळाली व त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली असून, तो मनासाचा रहिवासी दिनेश कुशवाहा आहे. मारहाण करणारा व  घटनेचा व्हिडिओ तयार करणारा दोघेही फरार आहेत. हा व्हिडिओ १९ मे रोजीचा आहे.

काँग्रेसचे टीकास्त्र

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी ट्वीट करून आरोपी दिनेश कुशवाहा हा भाजप नेता असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी राज्यातील कायदा-व्यवस्थेवर सवाल उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, अखेर हे सर्व मध्य प्रदेशातच का होत आहे?  सिवनीमध्ये आदिवासींची मारहाण करून हत्या करण्यात आली. सिवनीप्रमाणेच या घटनेतील आरोपीही भाजपशी संबंधित आहेत.

Web Title: Jain woman murdered in Madhya Pradesh on suspicion of being Muslim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.