RSS कार्यालय अन् हिंदू नेते दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 04:04 PM2020-02-10T16:04:43+5:302020-02-10T16:16:29+5:30

येत्या काही दिवसात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय, पोलीस स्टेशन, काही नेते हे आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत.

Intel input claims RSS offices, leaders can be attacked by global terror groups | RSS कार्यालय अन् हिंदू नेते दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा

RSS कार्यालय अन् हिंदू नेते दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा

Next

नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीवरुन देशभरात विविध भागात आंदोलन सुरु आहे. अशातच गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनुसार जागतिक दहशतवादी संघटनेकडून आरएसएसचं कार्यालय आणि त्यांचे नेते यांना निशाणा बनवण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी आयईडी आणि कारमधून बॉम्बस्फोट घडवण्याचा कट आखला जात असल्याचं सांगण्यात येत आहे. 

पंजाब, महाराष्ट्र आणि राजस्थान या भागात हा हल्ला होऊ शकतो असा दावा करण्यात आला आहे. येत्या काही दिवसात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय, पोलीस स्टेशन, काही नेते हे आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. त्यांच्यावर आयईडीचा वापर करुन हल्ला होऊ शकतो. त्यामुळे आवश्यक ती सुरक्षेची खबरदारी राज्यांनी घ्यावी अशी सूचना गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. 
उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून सुरक्षेचा आढावा घेण्यात येत आहे. यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब, राजस्थान, यूपी आणि आसाम याठिकाणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सुरक्षेचा आढावा घेण्यात येत आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

मागच्या महिन्यात बंगळुरु पोलिसांकडून ६ आरोपींना अटक करण्यात आलं. सीएए समर्थनार्थ काढलेल्या रॅलीमध्ये आरएसएस नेत्याची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. २२ डिसेंबरला बंगळुरुमध्ये काढण्यात आलेल्या रॅलीत आरएसएस नेते वरुण बोपाला यांच्यावर हल्ला करण्यात आला त्यामध्ये ते बचावले. या हल्ल्यातील ६ जणांना पकडण्यात पोलिसांना यश आलं होतं. त्यावेळी बंगळुरुचे पोलीस आयुक्त भास्कर राव यांनी सांगितले होते की, अटक केलेल्या ६ आरोपींच्या चौकशीत ते लोक मोठं षडयंत्र रचत असल्याची माहिती मिळाली. सीएए समर्थनार्थ रॅलीत हिंसाचार पसरवणे आणि हिंदू नेते त्यांच्या निशाण्यावर आहेत. यात पकडलेल्या आरोपींची नावे मोहम्मद इरफान, सैय्यद अकबर, सैय्यद सिद्दिक अकबर, अकबर बाशा, सनउल्ला शरीफ आणि सादिक उल अमीन अशी आहेत.     

दरम्यान बंगळुरु पोलिसांनी पकडलेल्या आरोपींच्या निशाण्यावर कोण कोण हायप्रोफाईल नेते आहेत. कोणाला निशाणा बनवणार आहे याबाबत कोणतीही माहिती उघड केली नाही. मात्र गुप्तचर यंत्रणेने दिलेली माहिती आणि बंगळुरु येथे घडलेल्या घटनेवरुन आरएसएस आणि हिंदू नेते दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याने सर्व पोलीस दलाला अलर्ट करण्यात आलं आहे. 

Web Title: Intel input claims RSS offices, leaders can be attacked by global terror groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.