Indigo आज १५०० उड्डाणे घेणार, १३५ ठिकाणांना जोडणार; एअरलाइन्सनं जारी केले निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 08:04 IST2025-12-07T08:03:02+5:302025-12-07T08:04:18+5:30
इंडिगोच्या गोंधळानंतर इतर विमान कंपन्यांनी विक्रमी भाडेवाढ जाहीर केली. ज्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या प्रवाशांची डोकेदुखी वाढली.

Indigo आज १५०० उड्डाणे घेणार, १३५ ठिकाणांना जोडणार; एअरलाइन्सनं जारी केले निवेदन
नवी दिल्ली - गेल्या पाच दिवसांपासून इंडिगो एअरलाइन्सच्या ढिसाळ कारभाराचा फटका हजारो प्रवाशांना बसला आहे. कर्मचारी कमतरतेमुळे शेकडो उड्डाणे रद्द झाली आहेत. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. विमानतळावरील परिस्थिती बिकट होताच आता विमान वाहतूक नियामक डीजीसीएने शनिवारी कठोर भूमिका घेतली. इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स आणि अकाउंटेबल मॅनेजर इसिड्रो पोरकेरास यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आणि २४ तासांच्या आत उत्तर देण्यास सांगितले आहे.
डीजीसीएने त्यांच्या नोटीसमध्ये म्हटलं की, विमान उड्डाणांना होणारा विलंब आणि उड्डाण रद्द करणे हे विमान कंपनीच्या नियोजन, देखरेख आणि संसाधन व्यवस्थापनातील गंभीर त्रुटी स्पष्टपणे दर्शवते. नियामकाच्या मते या व्यत्ययाचे प्राथमिक कारण म्हणजे नवीन एफडीटीएल (फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन) नियमांसाठी वेळेवर पुरेशी व्यवस्था करण्यात एअरलाइनला अपयश आलं आहे असं त्यांनी सांगितले. त्यातच इंडिगोने त्यांच्या अधिकृत निवेदनात नेटवर्क रिबूटमुळे त्यांना मोठ्या संख्येने उड्डाणे रद्द करावी लागली हे कबूल केले आहे.
Message from Pieter Elbers, CEO, IndiGo. pic.twitter.com/bXFdqoB0Q2
— IndiGo (@IndiGo6E) December 5, 2025
शुक्रवारी इंडिगोने ११३ ठिकाणी ७०० पेक्षा जास्त उड्डाणे झाली. हे पाऊल सिस्टम, रोस्टर आणि नेटवर्क स्थिर करण्यासाठी आवश्यक होते, जेणेकरून पुढील दिवशी प्रक्रिया सामान्य होऊ शकेल. आज रविवारी इंडिगो १५०० पेक्षा अधिक उड्डाणे करणार आहेत. त्यातून ९५ टक्के कनेक्टिविटी पूर्ववत होईल. १३८ पैकी १३५ ठिकाणी उड्डाण सुरू झाले आहेत. आम्हाला आणखी मोठा पल्ला गाठायचा आहे हे माहिती आहे परंतु आम्ही ग्राहकांचा विश्वास पूर्ण कमावण्यासाठी कटिबद्ध आहोत. या कठीण काळात सहकार्य केल्याबद्दल आम्ही प्रवासी आणि स्टाफचे आभारी आहोत असंही इंडिगोने त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे.
दरम्यान, इंडिगोच्या गोंधळानंतर इतर विमान कंपन्यांनी विक्रमी भाडेवाढ जाहीर केली. ज्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या प्रवाशांची डोकेदुखी वाढली. विमान भाड्यात अचानक झालेल्या वाढीबाबत नागरी उड्डाण मंत्रालयाने आता कडक भूमिका घेतली आहे आणि सरकारने काही विमान कंपन्यांना वाढीव भाड्यांबाबत गंभीर सूचना दिल्या आहेत. याव्यतिरिक्त प्रवाशांना जास्त भाडे देण्यापासून रोखण्यासाठी मंत्रालयाने भाडे मर्यादा लागू केल्या आहेत. सर्व विमान कंपन्यांना नवीन भाडे मर्यादांचे पालन करणे बंधनकारक आहे, जे परिस्थिती सामान्य होईपर्यंत लागू राहतील. मंत्रालयाने विमान भाड्याचे रिअल-टाइम ट्रॅकिंग करण्याचा आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विमान कंपन्यांवर तात्काळ कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.