IndiGoच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार, सरकारसोबतच्या बैठकीत CEO हात जोडताना दिसले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 19:57 IST2025-12-09T19:55:49+5:302025-12-09T19:57:27+5:30
IndiGo Crisis Updates: इंडिगोला नियमांतून कुठलीही सूट मिळणार नाही, उड्डाणांमध्येही १० टक्के कपातीचे आदेश

IndiGoच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार, सरकारसोबतच्या बैठकीत CEO हात जोडताना दिसले...
इंडिगो एअरलाइन्सचे सीईओ पीटर एल्बर्स यांना नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या मुख्यालयात बोलावण्यात आले होते, जिथे मंत्री राम मोहन नायडू आणि सचिव समीर सिन्हा यांनी ऑपरेशन्स, प्रवाशांची काळजी, परतफेड आणि सामानाची स्थिती यावर चर्चा केली. ऑपरेशनल संकटानंतर इंडिगोने सर्व उड्डाणे पुन्हा सुरू केल्याची आणि १,८०० हून अधिक उड्डाणे सुरू केल्याची माहिती दिली.
IndiGo Crisis Updates: इंडिगो एअरलाइन्सचे CEO पीटर एल्बर्स यांना मंगळवारी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या (MOCA) मुख्यालयात बोलावण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू आणि MOCAचे सचिव समीर सिन्हा देखील बैठकीत उपस्थित होते. बैठकीत इंडिगोची ऑपरेशनल स्थिती, प्रवाशांची काळजी, प्रवाशांच्या पैशाची परतफेड स्थिती, पायलट आणि क्रू रोस्टर स्थिती आणि सामान (लगेज) स्थिती यावर चर्चा झाली. विमान वाहतूक मंत्रालयाने एअरलाइनच्या CEO ना बोलावून प्रश्नांचा भडीमार केला. तसेच, विमाने रद्द होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने इंडिगोला विमान वेळापत्रकात १०% कपात करण्याचे आदेशही दिले.
During the last week, many passengers faced severe inconvenience due to Indigo’s internal mismanagement of crew rosters, flight schedules and inadequate communication. While the enquiry and necessary actions are underway, another meeting with Indigo’s top management was held to… pic.twitter.com/yw9jt3dtLR
— Ram Mohan Naidu Kinjarapu (@RamMNK) December 9, 2025
इंडिगोचे संकटाबद्दल म्हणणे काय?
विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांच्याशी बैठकीपूर्वी, इंडिगोने मंगळवारी घोषणा केली होती की एका आठवड्यापेक्षा जास्त काळ कामकाजात व्यत्यय आल्यानंतर त्यांच्या सर्व उड्डाणे सामान्यपणे सुरू होत आहेत. कंपनीने सांगितले की त्यांचे कामकाज सुरळीत झाले असून बुधवारी सुमारे १,९०० उड्डाणे चालवण्याची योजना आहे.
१,८०० हून अधिक उड्डाणांचा दावा
कंपनीच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की नेटवर्कमध्ये सुधारणा झाल्यानंतर सर्व नियोजित उड्डाणे सुरू होतील. विमानतळांवर अडकलेले जवळजवळ सर्व सामान आता त्यांच्या मालकांपर्यंत म्हणजेच पर्यटकांपर्यंत पोहोचेल आणि उर्वरित सामान लवकरच वितरित केले जाईल. सध्या इंडिगो त्यांच्या १३८ स्थानकांवर १८०० हून अधिक उड्डाणे चालवत आहे. याव्यतिरिक्त, कंपनीने त्यांच्या वेबसाइटवर, विमान उड्डाण रद्द केल्यावर त्यांच्या ग्राहकांसाठी पूर्ण परतफेड करण्याची प्रक्रिया सोपी आणि स्वयंचलित केली आहे.
नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू लोकसभेत काय म्हटले?
दरम्यान, नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी लोकसभेत स्पष्ट केले की इंडिगोला नवीन फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (FDTL) नियमांमधून कोणतीही विशेष सूट दिली जाणार नाही. त्यांनी सांगितले की कोणतीही विमान कंपनी, कितीही मोठी असली तरी, अशा प्रकारे प्रवाशांना त्रास देऊ शकत नाही. त्यांनी देशांतर्गत विमान बाजारात नवीन कंपन्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले, कारण इंडिगोचा मार्केट शेअर सुमारे ६५ टक्के आहे. DGCA ने इंडिगोला FDTL नियमांमधून तात्पुरती सूट दिली होती, ज्यामुळे टीका झाली. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला दिलेल्या प्रतिसादातही, कंपनीने नवीन FDTL नियमांचे कारण पुढे केले होते. त्यानंतर आता हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.