पायलट सुटीवर मग विमान कोण उडविणार होते? इंडिगोचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर, 'तिकीटे का बुक करायला दिली?'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 13:08 IST2025-12-07T13:08:30+5:302025-12-07T13:08:58+5:30
IndiGo Flight Cancellation Chaos: आज चौथ्या दिवशीदेखील इंडिगोची शेकडो विमान उड्डाणे रद्द झाली आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपासून प्रवाशांची नुसती होरपळ सुरु असून कंपनी या प्रवाशांना विमान रद्द करण्यात आल्याचे साधे कळवू देखील शकलेली नाही.

पायलट सुटीवर मग विमान कोण उडविणार होते? इंडिगोचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर, 'तिकीटे का बुक करायला दिली?'
देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो सध्या इतिहासातील सर्वात मोठ्या परिचालन संकटातून जात आहे. गेल्या काही दिवसांत इंडिगोच्या शेकडो विमानांचे उड्डाण रद्द झाल्यामुळे दिल्ली, मुंबई आणि पुणे यांसारख्या प्रमुख विमानतळांवर प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. अशातच लोक विमान कंपनीसोबत डीजीसीएला देखील दोष देत आहेत. जर नवीन नियमांमुळे विमान कंपनीचे पायलट सुटीवर होते, तर मग विमान कोण उडविणार होते? असा सवाल लोक उपस्थित करत आहेत. तसेच डीजीसीएला देखील तितकाच दोष देत, जर कंपनी विमाने उडविण्यास सक्षम नव्हती तर मग आमची तिकिटे का बुक करायला दिली, असा सवाल करत आहेत.
आज चौथ्या दिवशीदेखील इंडिगोची शेकडो विमान उड्डाणे रद्द झाली आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपासून प्रवाशांची नुसती होरपळ सुरु असून कंपनी या प्रवाशांना विमान रद्द करण्यात आल्याचे साधे कळवू देखील शकलेली नाही. एवढी भीषण परिस्थिती सध्या इंडिगोमध्ये झाली आहे.
विमान वाहतूक नियामक संस्था डीजीसीएने कठोर भूमिका घेत थेट इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. हे संकट प्रामुख्याने नवीन क्रू ड्युटी नियम लागू करताना इंडिगोने केलेल्या योजनांमधील त्रुटी आणि चुकीच्या अंदाजामुळे निर्माण झाले आहे. , इंडिगोने आवश्यक क्रू व्यवस्थापन नियम पाळले नाहीत आणि विमानाचे उड्डाण रद्द झाल्यावर प्रवाशांना योग्य माहिती किंवा सुविधा पुरवल्या नाहीत, असा सवाल या नोटीसमध्ये करण्यात आला आहे.
पायलट कमतरता
नवीन नियमांनुसार, पायलट आणि केबिन क्रूला जास्त विश्रांती घेणे अनिवार्य झाले. परंतु, इंडिगोने आपल्या हिवाळी वेळापत्रकात जास्त विमानाचे उड्डाण वाढवले आणि आवश्यकतेनुसार पायलटची संख्या वाढवली नाही.
कंपनीची कबुली
इंडिगोने DGCA कडे कबूल केले की, नवीन नियमांनंतर आवश्यक असलेल्या क्रूची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त होती, त्यामुळे अचानक पायलटची तीव्र कमतरता निर्माण झाली आणि शेकडो विमाने रद्द करावी लागली. मग जर पायलट सुट्टीवर होते तर मग विमान कोण उडविणार होते. कंपनीला आधीच कल्पना होती तर मग तिकिटे का वाटली, तेव्हाच नकार दिला असता तर आमच्यावर आज ही वेळ आली नसती, असा सवाल आता प्रवासी विचारू लागले आहेत.