एफडीआयमध्ये भारत जगात नवव्या स्थानी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 01:00 AM2020-06-17T01:00:21+5:302020-06-17T01:01:18+5:30

संयुक्त राष्ट्रांचा अहवालच देशातील गुंतवणूक वाढती राहण्याचा वर्तविला अंदाज

India ranks ninth in the world in FDI | एफडीआयमध्ये भारत जगात नवव्या स्थानी

एफडीआयमध्ये भारत जगात नवव्या स्थानी

Next

संयुक्त राष्ट्रे : सन २०१९ मध्ये भारतात ५१ अब्ज अमेरिकन डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) झाली असून, भारताने जगात नववा क्रमांक गाठला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या एका व्यापारविषयक संस्थेने तयार केलेल्या अहवालात ही माहिती जाहीर करण्यात आली आहे. कोरोनाच्या नंतरही भारतीय अर्थव्यवस्था ही वाढती राहण्याचा अंदाज असल्याने गुंतवणूक वाढत राहण्याचा होराही या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या कॉन्फरन्स ऑन ट्रेड अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट या संस्थेने विविध देशांमधील थेट परकीय गुंतवणुकीबाबत केलेल्या अभ्यासाचा अहवाल तयार केला असून, त्यामध्ये वरील माहिती देण्यात आली आहे.

आशिया खंडात भारत हा थेट परकीय गुंतवणुकीत अव्वल स्थानी राहिला आहे. सन २०१९मध्ये आशियात १.५४ ट्रिलीयन डॉलरची गुंतवणूक झाली आहे. चालू वर्षात यामध्ये ४० टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज या अहवालामध्ये व्यक्त करण्यात आला आहे. असे झाल्यास सन २००५ नंतर प्रथमच थेट परकीय गुंतवणूक ही १ ट्रिलियन डॉलरच्या खाली जाऊ शकेल.

दक्षिण आशियातील विविध देशांमधून परकीय गुंतवणूक भारतामध्ये वळण्याचे प्रमाण सहा टक्के एवढे झाले आहे. असे असले तरी या देशांमध्ये एकूण जागतिक गुंतवणुकीपैकी १ टक्का गुंतवणूक होताना दिसत आहे. आगामी वर्षात भारतामधील गुंतवणूक कमी होण्याची शक्यता या अहवालात वर्तविण्यात आली आहे. कोरोनाच्या साथीमुळे जगभरातील अर्थव्यवस्थांना बसलेल्या फटक्यामुळे चालू वर्षात थेट परकीय गुंतवणूक कमी होण्याची शक्यता वर्तविली गेली आहे.

४२ अब्ज डॉलरने वाढली गुंतवणूक
भारतामध्ये २०१९ या वर्षात ५१ अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक झाली असून, त्या आधीच्या वर्षापेक्षा त्यामध्ये ४२ अब्ज डॉलरची वाढ झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. सन २०१८ मध्ये झालेल्या थेट परकीय गुंतवणुकीत जगातील २० प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भारत १२व्या स्थानी होता. यावर्षी त्याने नवव्या स्थानावर उडी घेतली आहे. डिजिटल अर्थव्यवस्था आणि रिअल इस्टेट या दोन क्षेत्रांमध्ये भारतात मध्य मुदतीसाठी मोठी गुंतवणूक झालेली दिसून येत आहे.

Web Title: India ranks ninth in the world in FDI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.