स्वातंत्र्य दिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला पाकला गंभीर इशारा; मोदी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 10:39 AM2019-08-15T10:39:29+5:302019-08-15T10:40:28+5:30

काही लोकांनी फक्त भारताला नाही तर शेजारील देशांनाही दहशतवादाने बरबाद करुन टाकलं आहे. बांग्लादेश, अफगाणिस्तानही दहशतवादाशी लढतोय.

Independence Day Prime Minister Narendra Modi Speech On Terrorism Attack At Pakistan | स्वातंत्र्य दिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला पाकला गंभीर इशारा; मोदी म्हणाले...

स्वातंत्र्य दिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला पाकला गंभीर इशारा; मोदी म्हणाले...

Next

नवी दिल्ली - स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदहशतवादाच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानला घेरलं. दहशतवादाने फक्त भारत नाही तर दक्षिण आशियातील अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि श्रीलंका या देशांनाही उद्ध्वस्त केलं आहे. त्यामुळे दहशत पसरविण्याचं काम करणाऱ्या अशा लोकांना उखडून टाकायला हवं असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनीपाकिस्तानला नाव न घेता दिला. 

यावेळी भाषणात नरेंद्र मोदी म्हणाले की, काही लोकांनी फक्त भारताला नाही तर शेजारील देशांनाही दहशतवादाने बरबाद करुन टाकलं आहे. बांग्लादेश, अफगाणिस्तानही दहशतवादाशी लढतोय. श्रीलंकेत चर्चमध्ये झालेल्या स्फोटात अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले. दहशतीचं वातावरण निर्माण करणाऱ्या अशा लोकांना उखडून टाकलं पाहिजे. दहशतवाद्यांना खतपाणी घालणाऱ्यांना उघड केले पाहिजे. जगातील सर्व देशांनी यासाठी एकत्र येत दहशतवादाचा सामना करायला हवा. 

दरम्यान जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यावरुन पाकिस्तानचा थयथयाट झाला आहे. पाकिस्तान युद्धाची भाषा बोलू लागला आहे. बुधवारी पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात जर युद्ध झालं तर त्यासाठी जगातील अन्य देश जबाबदार असतील असं वक्तव्य केलं. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताकडून मोठी कारवाई होऊ शकते या भीतीने पाकिस्तानमध्ये घबराट पसरली आहे. तर दुसरीकडे भारताला युद्धाची धमकी देत आहे. 

भारतानं असं काही केल्यास आम्हीही युद्ध करण्यासाठी सज्ज असल्याचं इम्रान खान म्हणाले होते. तसेच भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध झाल्यास त्याला संयुक्त राष्ट्र जबाबदार असेल. पाकिस्तान काश्मीरचा मुद्दा हा जगातल्या प्रत्येक स्तरावर उपस्थित करत राहील. गरज पडल्यास आम्ही आंतरराष्ट्रीय न्यायालयातही जाऊ, येत्या काळात लंडनमध्ये मोठी रॅली काढण्यात येणार आहे. एकीकडे संयुक्त राष्ट्राची महासभा सुरू असेल, तर दुसरीकडे पाकिस्तान विरोध प्रदर्शन करेल. पाकिस्तान जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर सैरभैर झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे आगामी काळात जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावरुन भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

Web Title: Independence Day Prime Minister Narendra Modi Speech On Terrorism Attack At Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.