Independence Day : छोटं कुटुंब असणं ही देखील देशभक्ती - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 11:19 AM2019-08-15T11:19:26+5:302019-08-15T11:27:39+5:30

लोकसंख्या वाढीमुळे इतर समस्या वाढत असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. तसेच वाढती लोकसंख्या देशासमोरील गंभीर समस्या असल्याचं मोदींनी सांगितलं आहे. 

Independence Day 'Population explosion' in India is a big problem, says PM Modi | Independence Day : छोटं कुटुंब असणं ही देखील देशभक्ती - नरेंद्र मोदी

Independence Day : छोटं कुटुंब असणं ही देखील देशभक्ती - नरेंद्र मोदी

Next
ठळक मुद्देलोकसंख्या वाढीमुळे इतर समस्या वाढत असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. वाढती लोकसंख्या देशासमोरील गंभीर समस्या असल्याचं मोदींनी सांगितलं.'कुटुंब नियोजन करणं म्हणजे देशाच्या विकासात योगदान देणं, छोटं कुटुंब असणं ही सुद्धा एका प्रकारची देशभक्तीच आहे'

नवी दिल्ली - देशभरात 73 व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं. मोदींनी आपल्या भाषणात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. लोकसंख्या वाढीमुळे इतर समस्या वाढत असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. तसेच वाढती लोकसंख्या देशासमोरील गंभीर समस्या असल्याचं यावेळी मोदींनी सांगितलं आहे. 

'कुटुंब नियोजन करणं म्हणजे देशाच्या विकासात योगदान देणं, छोटं कुटुंब असणं ही सुद्धा एका प्रकारची देशभक्तीच आहे' असं मोदींनी म्हटलं आहे. लोकसंख्येची अनियंत्रित वाढ रोखण्यासाठी सामाजिक स्तरावर प्रयत्न करायला हवेत. तसेच ज्या लोकांची कुटुंबं छोटी आहेत त्यांचा सन्मान करायला हवा असं ही मोदींनी आपल्या भाषणात म्हटलं आहे. वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी जनजागृती होणं आवश्यक आहे. सामाजिक स्तरावर जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन केले पाहिजे. देशातील एका वर्गाला या समस्येची जाणीवही आहे. त्यामुळे मुलांच्या जन्मावेळी ते नीट विचार करतात. सर्वांनीच यावर गांभीर्याने विचार करावा असं देखील मोदींनी सांगितलं. 

'कलम 370' संदर्भात मोदींनी विरोधकांवर टीका केली आहे.  'जे 70 वर्षांमध्ये तुम्हाला जमलं नाही ते आम्ही 70 दिवसांत करुन दाखवलं' असा टोला नरेंद्र मोदींनी लगावला आहे. नव्या सरकारनं अवघ्या 10 आठवड्यांमध्ये 'कलम 370' , तिहेरी तलाकबद्दल महत्त्वाचे निर्णय घेतले असं ही म्हटलं आहे. तसेच 'कलम 370' करुन वल्लभभाई पटेल यांचं स्वप्न साकारण्याकडे एक पाऊल टाकलं. जुन्या व्यवस्थेमुळे जम्मू, काश्मीर, लडाखमध्ये भ्रष्टाचार वाढला असं ही मोदींनी आपल्या भाषणात म्हटलं आहे. 

पंतप्रधान मोदींनी ''कलम 370' संदर्भात निर्णय घ्यावा असं सर्वांनाच वाटत होतं. अखेर केंद्र सरकारने यासाठी पुढाकार घेत निर्णय घेतला. लोकांनी दिलेलं काम करण्यासाठी आम्ही सत्तेत आलो आहोत' असं म्हटलं आहे. मुस्लिम महिलांना समानतेचा अधिकार मिळावा यासाठी तिहेरी तलाक रद्द केला. तिहेरी तलाक राजकीय निर्णय नव्हे, समानतेसाठी घेतलेला निर्णय असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. तसेच आम्ही समस्या टाळत नाही, आम्ही समस्या फार काळ ठेवतही नाही. व्यवसाय सुलभीकरणासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलं आहे. वाढती लोकसंख्या देशासमोरील गंभीर समस्या आहे. पायाभूत सोयीसुविधांसाठी 100 लाख कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती मोदींनी दिली आहे. 

लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठी घोषणा केली. संरक्षण दलांना बळकटी देण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पद तयार करण्यात येणार असल्याचं मोदींनी म्हटलं. संरक्षण दलांमध्ये सुधारणा कराव्यात, अशी मागणी बऱ्याच कालावधीपासून सुरू होती. त्याच अनुषंगानं हा निर्णय घेण्यात आल्याचं मोदींनी सांगितलं. 

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफकडे तिन्ही दलांमध्ये समन्वय राखण्याचं काम असेल. सध्या जग वेगानं बदलत आहे. त्यामुळे भारताला तुकड्या तुकड्यांमध्ये विचार करता येणार नाही. आपल्या सैन्य दलांनी एकत्रितपणे पुढे जायला हवं. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफमुळे तिन्ही दलांना वरिष्ठ पातळीवर एक प्रभावी नेतृत्व मिळेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. सध्या चीफ ऑफ स्टाफ पद अस्तित्वात आहे. चीफ ऑफ स्टाफ कमिटीत तिन्ही दलांच्या प्रमुखांचा समावेश असतो. यातील वरिष्ठ सदस्याकडे समितीचं चेअरमनपद दिलं जातं. चीफ ऑफ डिफेन्स पद निर्माण केलं जावं अशी मागणी बऱ्याच कालावधीपासून करण्यात येत होती. त्याच पार्श्वभूमीवर मोदींनी हा मोठा निर्णय घेतला. 

भारताला थेट युद्धाची धमकी देणाऱ्या पाकिस्तानवर मोदींनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. जगात सध्या असुरक्षेचं वातावरण आहे. जगाच्या कोणत्या ना कोणत्या भागावर चिंतेचं सावट आहे. काही भागातून दहशतवादाला खतपाणी घातलं जात आहे. मात्र भारत अशा शक्तींविरोधात ठामपणे उभा आहे आणि यापुढेही राहील, असा निर्धार मोदींनी व्यक्त केला. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांचा खरा चेहरा आम्ही जगासमोर आणू. दहशतवाद्यांचा खात्माही करू. काहींनी केवळ भारतालाच नव्हे, तर बांग्लादेश, अफगाणिस्तान, श्रीलंकेसारख्या देशातही दहशतवाद पसरवला आहे. या परिस्थितीत भारत शांत राहू शकत नाही. दहशतवादी कारवाया करणाऱ्यांचा पदार्फाश करण्याचं काम भारत सुरूच ठेवेल, असंही मोदी म्हणाले. 



 

Web Title: Independence Day 'Population explosion' in India is a big problem, says PM Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.